हृदयद्रावक : जमिनीच्या तुकड्यासाठी पुतण्याने सख्या काकूला चिरडले
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । शेळावे खुर्द येथे शेतीच्या वादातून २२ वर्षीय सख्या पुतण्याने जमिनीच्या एका तुकड्यासाठी आपल्या काकूला वाहनाखाली चिरडले यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. १० रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हि घटना घडली.
अधिक माहिती अशी कि , बापू काळू सांगळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, बापू सांगळे यांचे सख्खे भाऊ दत्तू सांगळे व त्यांची शेती लागून आहे. या विहिरीवर पाणी भरण्याचा सामायिक अधिकार असून १० रोजी सकाळी अलकाबाई बापू सांगळे, विद्या महेंद्र सांगळे, मनीषा दत्तू सांगळे, दत्तू सांगळे हे आपापल्या शेतात काम करत होते. या वेळी पाण्याचा पंप बंद केल्यावरून महिलांमध्ये जोरदार वाद झाले. यात विद्या सांगळे व मनीषा सांगळे या जखमी झाल्या. ही घटना दत्तू सांगळे यांचा मुलगा राहुल उर्फ सोनू सांगळे यास माहिती पडताच त्याने आपल्या ताब्यात असलेले छोटा हत्ती वाहन (एमएच- १९, सीवाय- ८१८३)हे भरधाव घेऊन शेतात आला. तसेच काहिही विचार न करता त्याने आपल्या काकू अलकाबाई बापू सांगळे यांच्या अंगावर दोन वेळा हे वाहन चालवल्याने अलकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत आहे.
दोन्ही सख्ख्या भावांमध्ये मागील ७ वर्षापासून शेतीचा वाद सुरू आहे. त्याचा गंभीर परिणाम होवून काकूच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या राहुल उर्फ सोनू यास पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. याबाबत सायंकाळी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सपोनि राजू जाधव करत आहेत.