जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । महाराष्ट्रात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सर्तक झाला असून करोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच जे लाभार्थी नागरिक अद्यापही लसीकरणापासून वंचीत आहेत. त्यांच्यासाठी धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गाव व पाड्यांवर मिशन हर घर दस्तक अभियान राबविले जात आहे.
मागील दोन ते तीन आठवड्यांपासून करोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सर्वाधिक रुग्ण जरी शहरी भागातील असले तरी, दक्षता म्हणून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेकडून करोना चाचण्या आणि लसीकरणावर विशेष भर दिला जात आहे. ग्रामीण भागात अद्यापही अनेक नागरिक असे आहेत की, त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. या नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी मिशन हर घर दस्तक अभियान
राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन करोना लसीकरणाच्या वंचित लाभार्थ्यांचा शोध घेणार आहेत. असे नागरिक आढळून आल्यास त्यांचे जवळच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले, डॉ.मंजुषा भोने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी सी.पी.पाटील, बी.एस.सोनवणे, कल्पना सूर्यवंशी, प्रदीप अडकमोल, राहुल सोनवणे, नितीन महाजन, भिकू बाई बोदडे आदी लसीकरण करीत असून आशा स्वयंसेविका मदत करीत आहेत.