Jalgaon : हतनूर धरणाचा विसर्ग वाढला..! तापी नदी पुन्हा खळाळून वाहू लागली

जुलै 23, 2025 4:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । मागील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने अवाक घटली होती. यामुळे मागच्या काही दिवसापासून धरणाचे दोन दरवाजे फक्त अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पुनरागमनानंतर पुन्हा आवक वाढल्याने हतनूरचे सहा दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे आज बुधवारी सकाळी सांडव्यातून ११ हजार ४४२ क्यूसेक आणि कालव्यातून ५० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

hatnur dam jpg webp

दरम्यान जळगाव जिल्ह्यात जुलै संपण्यावर आला तरी समाधानकारक पाऊस झाला नाहीय. सध्या पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील मागच्या आठ दिवसापासून पाऊस विसर्ग घटला होता. काही दिवसापासून दोन दरवाजे फक्त अर्धा मीटरने उघडे होता.

मात्र आता पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने हतनूरच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, पाटबंधारे विभागाला सहा दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सकाळी धरणातून ११ हजार ४९२क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत होता. यामुळे तापी नदी पुन्हा खळाळताना दिसू लागली आहे.

दरम्यान, हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर तापीवरील शेळगाव बॅरेजचेही तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून ८७०२ क्यूसेकने विसर्ग होत आहे. हतनूर धरणासह शेळगाव बॅरेजमधून एकाच वेळी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर हतूनर व शेळगाव बॅरेजमधील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जळगावकरांना दिलासा

दरम्यान जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात यंदा जलसाठा मुबलक आहे. २४८.५५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणात सद्यःस्थितीत १६०.८५ दशलक्ष घनमीटर (६४.७१ टक्के) उपयुक्त पाणी साठा आहे. गेल्या काही वर्षात एकदाही वाघूरने तळ गाठलेला नाही. यंदा धरण परिसरात अजुनही चांगला दमदार पाऊस पडलेला नाही. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे वाघूरची पाणी पातळी बऱ्यापैकी वाढण्यास हातभार लागलेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now