⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हरभजन सिंगचा स्तुत्य निर्णय : राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । खासदारांना गलेलठ्ठ पगार मिळत आल्याचे मेसेज नेहमी सोशल मीडियात फिरत असतात. क्रिकेटमधून राजकारणात आलेला भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने नुकतेच एक स्तुत्य निर्णय जाहीर केला असून त्याने स्वत:च याबाबतची माहिती दिली. खा.हरभजन सिंहने ट्विट केले करीत ‘राज्यसभा सदस्य म्हणून मी माझा राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी देत आहे. आपला देश अधिक चांगला व्हावा यासाठी मला योगदान द्यायचे आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन, असे त्यांनी म्हटले आहे.

हरभजन सिंहने गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो पंजाबमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत अनेक वेळा दिसला. तेव्हा भज्जी लवकरच काँग्रेस किंवा भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे न झाले नाही. त्याने आम आदमी पक्षात प्रवेश केला. भज्जी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. आपकडून निवडणूक लढवत हरभजन सिंह विजयी देखील झाले होते.

हरभजनची क्रिकेट कारकीर्द 23 वर्षांची आहे. सध्या तो आयपीएल 2022 च्या मोसमात कॉमेंट्री करत आहे. अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीत 2011 विश्वचषक आणि 2007 टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. 2011 च्या विश्वचषकात त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या आणि 2007 च्या T20 विश्वचषकात 7 विकेट्स घेत महत्वाची भूमिका बजावली होती.

पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या हरभजनने आपल्या शानदार कारकिर्दीत 103 कसोटीत 417 विकेट्स आणि 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 बळी घेतले. याशिवाय त्याच्या खात्यात 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 विकेट्स आहेत. भज्जीने आयपीएलमध्ये 163 सामने खेळून 150 बळी घेतले. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून क्रिकेट खेळला आहे.

हरभजन सिंह याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून शेतकरी बांधवांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. देशात इतर खासदारांनी देखील असा आदर्श उभा केल्यास लाखो शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.