मंगळवार, सप्टेंबर 19, 2023

व्यवसायासाठी माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज। २० जुलै २०२३। जळगाव जिल्ह्यातील धामणगाव येथील माहेर असलेल्या विवाहित स्त्रीला पैश्यांसाठी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. माहेरहून १५ लाख रुपये आणण्यासाठी विवाहित महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील माहेर असलेल्या प्रतिक्षा आकाश मनोरे (वय-२५) यांचा विवाह नंदूरबार येथील आकाश संजय मनोरे यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे दोन महिन्यानंतर लग्नात मानपान दिला नाही असे टोमणे मारणे सुरू झाले. त्यानंतर पती आकाश मनोरे याने व्यावसाय करण्यासाठी माहेरहून १५ लाख रूपये आणण्याची मागणी केली.

विवाहितेने पैसे दिले नाही म्हणून तिला सतत मारहाण करत छळ केला. त्यानंतर सासू, सासरे, दीर आणि ननंद यांनी देखील पैशांचा तगादा लावला. हा छळ सहन न झाल्याने विवाहित धामणगाव येथे माहेरी निघून आल्या. मंगळवारी १८ जुलै रोजी विवाहितेन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून छळ केल्याची तक्रार दिली.

त्यानुसार पती आकाश संजय मनोरे, सासू उज्वला संजय मनोरे, सासरे संजय विठ्ठल मनोरे, दीर शुभम संजय मनोरे आणि ननंद महिमा चेतन बागुल सर्व रा. नंदूरबार यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.