⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हनुमान चालीसा, भोंग्यांच्या राजकीय आवाजाने भरकटणारी तरुणाई?

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यातील वातावरण गेल्या महिन्याभरापासून चांगलेच ढवळून निघाले आहे. भ्रष्टाचारच्या आरोपात ईडीच्या तावडीत सापडणारे राज्य सरकारचे मंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा वर काढलेला मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न. दोन्ही विषय ज्वलंत असून त्यावरच राज्याचे भवितव्य अवलंबून आहे असे बिंबविण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजप टीकेची एक संधी सोडत नाही तर दुसरीकडे महाविकासचे एक-एक प्यादे गारद होऊ लागले आहे. संयमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही संयम बाळगून असले तरी खालच्या स्तरावर मात्र कार्यकर्ते एकमेकांच्या कानशिलात लगावत आहे. भोंग्याच्या मुद्द्याला जोडूनच बाहेर आलेला हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा देखील लक्षात घेण्यासारखा आहे. भोंग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार त्वरित निर्णय घेत नसल्याने सोशल मीडियासह राज्यात धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणाई तर भडक मुद्द्याने प्रभावित होऊन धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर येऊन ठेपली असून केव्हाही तो ज्वालामुखी बाहेर पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. राजकारण्यांच्या डावात सामील न होता पोलीस आणि कोर्ट कचेरीपासून लांब राहत आपले चारित्र्य कसे स्वच्छ राहील याचा विचार करणे तरुणाईला आवश्यक आहे.

प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असावा आणि तो असायलाच हवा परंतु आपला धर्माभिमान जोपासताना इतरांचा धर्म दुखावला जाणार नाही याची दक्षता राखणे देखील तेवढेच गरजेचे आहे. भोंग्याचा मुद्दा अनेक वर्षापासून चर्चिला जात असून सर्वच धार्मिक स्थळांच्या बाबतीत निकाल देता सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहे. भारतात आज संविधानानंतर जर कुणी सर्वश्रेष्ठ असेल तर ते न्यायदेवता आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही राज्य व्यवस्था प्रदान केली आहे. याच लोकशाही राज्यात आपणच आपले लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. मतापेक्षा पैशाला किंमत अधिक दिली जात असल्याने आपण चुकतो आणि तिथे माती होते. लोकप्रतिनिधी आपल्यासाठी असतो पण सध्या तरी तरी काही दिसत नाही. राज्यात तर सर्वच आलबेल चालल्याचे चित्र आहे.

भाजपकडून महाविकासला वारंवार टार्गेट केले जात होते त्यात आता मनसेचे राज ठाकरे आणि अपक्ष राणा दाम्पत्याची भर पडली. उरले सुरले तर राणे पिता-पुत्र आहेच कोकणी दणका द्यायला. आम्ही निडर आहोत, तोडीस तोड उत्तर देणार म्हणणाऱ्या महाविकास आघाडीतील एक एक नेत्याची विकेट पडत आहे. १०० कोटींच्या टार्गेटमुळे काही बाहेर पडले तर काहींना ईडीने गाठले. नेते आत बाहेर होत असले तरी रस्त्यावर मात्र कार्यकर्ते आणि सोशल मीडियात चाहते व्यक्त होत आहेत. रस्त्यावर आक्रमक होणाऱ्यांना पोलिसांचा हिसका तात्काळ दिसतो तर सोशल मीडियातील उत्साही तरुणाईला ‘जोर का झटका धीरे से लगे’ असे काही भोगावे लागत आहे. कुठे आपल्या नेत्यावर कारवाई झाली म्हणून कुणाच्या तरी पोस्टला कमेंट करायची, शब्दाला शब्द भिडला कि शिवीगाळ करायची आणि मग गुन्हा दाखल झाल्यावर पश्चाताप करायचा असे चित्र आहे. राजकीय गुन्हे काही काळाने मागे घेतले जात असले तरी आपल्यावर लागलेला गुन्ह्याचा कलंक मात्र तात्काळ पुसला जात नाही. ऐन नोकरीच्या काळात हाच गुन्हा अडचणींचा ठरतो मग होत्याचे नव्हते होते. नेते आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असले तरी सर्वस्व नाही हे तरुणाईने लक्षात घेणे गरजेचे आहे. पालक हेच आपल्यासाठी कामी येतात हे जर तरुणाईने ओळखले तर कोणताच नेता मोठा होणार नाही.

नेत्यांच्या आशिर्वादाने मोठे होणारे चिमूटभर असले तरी नेत्यांमुळे जेलची हवा खावी लागणारे मूठभर असतात. चादरी उचलणारे नेहमी मागेच राहतात तर चापलुसी करणारे पुढे जातात हे ज्या कार्यकर्त्याला समजले तोच स्वतःची प्रगती करू शकतो. आजचा तरुण हुशार आहे, सुशिक्षित आहे, समजदार आहे असे वाटत असले तरी पक्षनिष्ठा आणि राजकीय ग्लॅमरमुळे तो देखील वेड्यासारखा वागतो. कुठे एखाद्या आंदोलनात जातो, कुठे आक्रमक होतो, कुठे दगड हातात घेतो, पार्ट्यांमध्ये मद्य रिचवतो हे सर्व क्षणिक असले तरी त्याला गोड वाटते. आपले हित कशात आहे हे ओळखणारे तरुण वेळीच योग्य मार्ग धरतात आणि न समजणारे या नेत्यांच्या राजकीय खेळीत बळीचे बकरे होऊन बसतात. आज कारवाई, आरोपामुळे कारागृहात असलेले नेते उद्या पुन्हा ताठ मान करून समाजात फिरतील यात शंका नाही. सकाळी एकमेकांना शिव्या देणारे नेते सायंकाळी टेबलावर बैठकीला सोबत असतात.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्याभरापासून एक मुद्दा जोरात लावून धरलाय तो म्हणजे मशिदीवरील भोंगे. ‘तुम्ही भोंगे हटविले नाही तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविणार’ अशी घोषणा करीत राज ठाकरेंनी जोरदार कमबॅक केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भोंग्याच्या विषयाला हात तर घातला आहे सोबतच शिवसेना आणि महाविकास आघाडीला इशारा देत गोचीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला आहे. राज ठाकरे यांनी सरकारला ३ मेपर्यंतचा वेळ दिला असून तत्पूर्वी ते औरंगाबाद येथे भव्य सभा घेणार आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा आजवरचा गड राहिला असून तिथूनच हि सुरुवात केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी मुद्देसूदपणे विषयाला हात घालून एक-एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली. सोशल मीडियात आणि माध्यमात सध्या फक्त राज ठाकरे, भोंगे आणि हनुमान चालीसाचीच चर्चा आहे. भाजप बाहेरून आनंद घेत असली तरी राज ठाकरे, राणा दाम्पत्य विरुद्ध महाविकास आघाडी युद्ध जोरदार अनुभवायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या भोंगा मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरणात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून सोशल मिडीयातील स्टेटसवरून राज्यात अनेक ठिकाणी जातीय तेढ देखील निर्माण झाले.

शिरसोली गावात झालेल्या जातीय तेढमध्ये पोलिसांनी धरपकड केलेले तरुण तर मिसुर्डे देखील फुटलेले नाही असे आहेत. कुठेतरी काही स्टेटस पहिले आणि त्यावरून वाद करून बसले अशी अवस्था त्यांची होऊन बसली आहे. आपली पोरं गरमाट्यची जेलची हवा खाताय आणि पालक बिचारे बाहेर घामाच्या धारा वाहत काळजी करताय. राज ठाकरेंच्या स्टेटसमुळे झालेले वाद वेगळे आणि हनुमान चालीसा, भोंगे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट यावरून झालेले वाद, सायबर गुन्हे तर आणखी वेगळे आहेत. धर्माचा अभिमान बाळगताना आपण काय शेअर करतोय, कुठे करतोय, कशासाठी करतोय, त्याचे परिणाम काय होऊ शकतात या सर्वांचा विचार तरुणांनी करणे आवश्यक आहे. राज ठाकरेंचे एका सभेतील वाक्य होते, मी पक्षाचा जेव्हा विचार करीत होतो तेव्हा पहिला विचार माझ्या मनात आला. माझ्या पक्षात काम करणारा जो कार्यकर्ता असेल. त्याच्या घरी त्याचे वडील, त्याची आई, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याची बायको, त्याची मुले.. यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असले पाहिजे कि, हा राज ठाकरे बरोबर आहे, हा कुठे फुकट गेलेला नाही पोरगा माझा’ राज ठाकरे यांच्या या वाक्याने राज्यात मोठी हवा केली असली तरी आज त्याच राज ठाकरेंमुळे त्याच माय-बापांना चिंता लागून राहिलीय.

राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडावा, तुम्ही देखील त्या मुद्द्याचे समर्थन करावे परंतु कायदा हातात घेऊ नये. लोकशाही मार्गाने सरकारला कसे आपल्यासमोर नमते घ्यावे लागेल हे पटवून देण्याचे कार्य तरुणाईला करावे लागणार आहे. आपण कोणते पाऊल उचलतो यावर आपले पुढील भविष्य अवलंबून असते. भोंगे, हनुमान चालीसा असे कितीतरी मुद्दे पुढे येतील परंतु त्यावर समजदारीने भूमिका घेणे आवश्यक असते. जे नरेंद्र मोदींना जमले तर राज्य सरकारला का जमत नाही? हा प्रश्नच आहे. देशातील आजवरचा सर्वात ज्वलंत मुद्दा म्हणजे ‘अयोध्येतील राम मंदिर’. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि सर्वांनी तो स्विकारला. देशात कोणताही जातीय तेढ निर्माण न होता शांतता कायम राहिली. उत्तरप्रदेशात भोंगे हटविण्याचा प्रश्न मार्गी लागला, शांतता कायम राहिली. राज्यात गेल्या महिन्याभरापासून मशिदीवरील भोंगे हटविण्याचा मुद्दा चर्चिला जात असून सरकार त्यावर अद्याप विचार करू शकलेली नाही. अक्षय तृतीयेपर्यंत सरकारने काही निर्णय घेतला किंवा नाही? आपण मात्र आपली सद्सदविवेक बुद्धी जागरूक ठेवत पुढील पाऊले उचलने आवश्यक आहे. तरुणांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन नको ते कृत्य केल्यास सरकार आणि कुणीच तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून वाचवायला येणार नाही. आपली पाऊले भरकटत जाऊ न देता योग्य दिशेला नेत भारताला महासत्ता बनविण्याचा प्रयत्न करायला हवा.