⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | विशेष | गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंड थांबले असते मात्र तीनपाट माणसाच्या सल्ल्यामुळे…

गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंड थांबले असते मात्र तीनपाट माणसाच्या सल्ल्यामुळे…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जून २०२३ | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेवून केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यासंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मन मोकळे केले आहे. वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना ते म्हणाले की, त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलायला दोनच मुद्दे आहेत, एक गद्दार आणि दुसरा खोके. ठीक आहे, परंतु ३५ वर्ष आम्ही तिथेच घासली आहेत. त्यांनी आमची बॅक हिस्ट्री चेक करावी. आम्ही घरांवर तुळशीपत्र ठेवून कामे केली आहेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधली ती कुठेतरी लयास जातेय असा विषय आल्यावर आम्हाला वाईट वाटले. आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न करा म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो तर उलट मलाच सांगितले, तुम शेर जैसे दिखते हो, लेकीन दिल चुहे जैसा है, तुला जायचे असेल तर तू जाऊ शकतो. हे संजय राऊतांचे वाक्य आहे. या महामंडलेश्वराने शिवसेनेची वाट लावली. त्याच्यामुळेच शिवसेनेला हे दिवस आले आहेत.

सुरुवातीला जेव्हा काही आमदार गेले, तेव्हा आम्ही सांगून सुद्धा कोणीतरी एखादा तीनपाट माणूस त्यांना सल्ला देत असेल आणि ते त्याचे ऐकत असतील तर काय होणार. मी तर ३३ नंबरला गेलो ना? मी त्यांना सांगून गेलो. गद्दारी करायचीच असती तर नारायण राणेंनी केली तेव्हाच गेलो असतो. त्यावेळी मी आमदार होतो आणि त्यावेळीही आम्हाला ऑफर होती. राज ठाकरे गेले तेव्हाही गद्दारी करू शकलो असतो, परंतु आम्ही तसे केले नाही. यावेळी मात्र विचारांचा विषय आला, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

शरद पवार आणि अजित पवारांचा दिला दाखला
आत्ता फक्त ११ आमदार सुरतला गेले आहेत. आपण त्यांना परत बोलवा. अजित पवारांना पवारसाहेब परत बोलावू शकतात, आपणही आपल्या नेत्यांना परत बोलावले पाहिजे. आपल्या नेत्याने आपल्या चांगल्या कार्यकर्त्याला गेल्यानंतर परत बोलवायचा प्रयत्न का केला नाही हा माझा सवाल आहे. हा प्रयत्न केला असता तर आमच्यासारख्या लोकांची आणि आमदारांची मने वळली असती. आम्हाला वाटले असते की बाबा हा माणूस प्रयत्न करतोय, पण हीच लोक ऐकत नाहीत. तो प्रयत्न यांनी केला नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंवर गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.