⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

गुलाबराव पाटील राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री; गुलाबराव देवकरांचा हल्लाबोल

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० ऑगस्ट २०२३ | विधानसभा निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी आतापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओखळले जाणारे गुलाबराव पाटील व गुलाबराव देवकर यांच्यात शाब्दीक सामना सुरू झाला आहे. पाटील – देवकर हे दोन्ही आजी-माजी पालकमंत्री एकमेकांवर टीका करत आव्हान-प्रतिआव्हान देत आहेत.

राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांवर टीका केली होती. देवकर हे फेडरेशनच्या कामात कमिशन घेतात. मंत्री असतानाही काहीही केले नाही, उलट त्यांनी ठेवलेले खरकट आम्ही साफ करीत आहोत. त्या टिकेला गुलाबराव देवकर यांची प्रतिउत्तर देत गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या ५ सप्टेंबरला होणाऱ्या दौऱ्यानिमित्त एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली, यावेळी पत्रकारांशी बोलतांना गुलाबराव देवकर म्हणाले की, गुलाबराव पाटील हे जिल्ह्यातील प्रत्येक कामात दहा टक्के कमिशन ते घेत आहेत. या शिवाय पाणीपुरवठा योजनेच्या राज्यातील प्रत्येक निविदांमध्ये दहा टक्के कमिशन घेतात. जिल्ह्यातील वाळू तसेच दारू व्यवसायतही त्यांचे कमिशन असते. गुलाबराव पाटील हे राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री आहेत असा सनसनाटी आरोपही त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलतांना देवकर म्हणाले की, आपण मंत्री असताना धरणगावात उड्‌डाण पूल केला. लांडोरखोरी उद्यानाचे काम केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचे काम सुरू केले. परंतु गुलाबराव पाटील आज मंत्री आहेत, कायम लक्षात राहावे असे कोणतेही ठोस काम त्यांनी केलेले नाही. त्यांनी असे ठोस कोणते काम केले आहे, हे सुद्धा जनतेला दाखवून द्यावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

गुलाबराव म्हणतात मी सालदाराचा मुलगा आहे, मग आता एवढी संपत्ती कशी आली, हे त्यांनी जनतेला सांगावे. मी राज्याच्या मंत्री होतो, गुलाबराव पाटील राज्याचे मंत्री आहेत. ते म्हणतात, मी भ्रष्टाचार केला आहे तर दोघांच्या संपत्तीचे मोजमाप करा असे खुले आव्हानच देवकर यांनी मंत्री पाटील यांना दिले आहे. पाटील-देवकरांच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आतापासूनच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.