⁠ 
शुक्रवार, फेब्रुवारी 23, 2024

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाबाबत गुलाबराव पाटलांना वाटतेयं ही भीती; वाचा काय म्हणाले

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० सप्टेंबर २०२३ | राज्य व देशातील राजकीय वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज लावणे थोडेसे कठीण आहे. असे असले तरी २०२४ मध्ये होवू घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातही मोठी राजकीय उलथापालथ होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या विद्यामान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापून राज्याचे वजनदार मंत्री गिरीश महाजन यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची चर्चा सुरु आहे. अशातच जिल्ह्यातील दुसरे वजनदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मतदार संघाबाबत एक भीत व्यक्त केलीयं.

जळगाव शहरात सखी वन स्टॉप सेंटर इमारतीच्या जागेचे भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमावेळी मंत्री गुलाबराव पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सध्या महिलांना ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण या मतदारसंघापैकी एका मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा निघणार आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महिलांसाठी राखीव जागा निघाल्यास आमचं कठीण आहे, अशी भीती मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना बोलून दाखवली.
कारण मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार आहेत.

गुलाबराव पाटील सुरेश भोळे यांना ‘मामा’ उद्देशून म्हणाले, की ‘तुमच्याकडे तरी मामी तयार आहे… पण आमचं कठीण आहे…’ असं म्हणत त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या. आमदार सुरेश भोळे यांना राजूमामा म्हणून ओळखले जाते त्यांच्या पत्नी सीमा भोळे या देखील राजकारणात सक्रिय आहेत. त्या जळगाव महापालिकेच्या महापौर देखील होत्या. यामुळे गुलाबराव पाटलांनी राजूमामा यांना तुमच्याकडे तरी मामी तयार आहे, असं म्हटलयं.