जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । धरणगाव शहरातील गंभीर बनलेल्या पाणीपुरवठ्याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: रुग्णालयात कोविडचा उपचार घेत असताना अॅक्शन मोडवर येत आज गुरुवारी (ता. २५) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तातडीने अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता धरणगाव शहरात पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
धरणगाव शहरात तब्बल २२ ते २५ दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू होता. याची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी (ता. २५) तत्काळ अंजनी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. धावडा तसेच पिंप्री येथे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. दोघेही ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
धावडा येथील मुख्य जलवाहिनीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम पुणे येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. पुढील आठवडाभरात धावडा – धरणगाव जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरळीत होईल. मागील काही दिवसांपासून गाळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे पिंप्री येथील शहराला पाणीपुरवठा केला जात होता. परंतु जमिनीतील पाणीसाठा संपल्यामुळे धरणगावकरांवर पुन्हा एकदा पाण्याचे संकट निर्माण झाले होते. या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना गटनेते पप्पू भावे आणि शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. तसेच अंजनीत पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानुसार अंजनी गुरुवारी (ता. २५) रात्रीपर्यंत १.२० दलघमी एवढे पाण्याचे आवर्तन पोहोचणार आहे.