⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

खासदार उन्मेष पाटलांचे डोळे फुटलेय काय?, गुलाबराव पाटलांची खरमरीत टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काय दिले, असे म्हणणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजनांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तोफ डागली आहे. शेतकऱ्यांसाठी काय दिले, असे म्हणणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांचे डोळे फुटले आहेत काय? जबाबदार खासदारांना हे शोभेसे नाही. आपण दोन वर्षांत काय काम केले, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन गेल्यावेळी जलसंपदामंत्री असताना, त्यांनी काय बोंब पाडली? हे समोर येऊन सांगावे, अशी खरमरीत टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील केली.

उत्तर देण्याइतपत त्यांची लायकी नाही

आमदार किशोर पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. ना.पाटील म्हणाले, की विरोधक टीका करतात, त्यांना उत्तर देण्याइतपत त्यांची लायकी नाही. आम्ही कामामुळेच सत्तेत आहोत, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. माजी मंत्री व जबाबदार खासदार काहीही बोलतात. जनतेची दिशाभूल करतात. जनता इतकी खुळी नाही. भाजपने अफवा खाते बंद करावे आणि लोकांच्या कामाकडे लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना आम्ही काय दिले याचा पुरेपूर हिशोब देतो. समोर या, आपली काय बोंब पडली ते ही सांगा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

भाजपने आम्हाला नैतिकता शिकवू नये, असे सांगून दोन टर्मला आपण मला वाढदिवशी पालिकेची सत्ता गिफ्ट केली. या वेळीही वाढदिवसानिमित्त मी पालिकेची सत्ता आपणाकडे गिफ्ट म्हणून मागत आहे, असे भावनिक त्यांनी आवाहन केले. त्यास उपस्थितांनी घोषणाबाजी करत व टाळ्यांची दाद दिली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भलामोठा हार व शाल देऊन आमदार पाटील यांचे अभिष्टचिंतन केले. रमेश बाफना यांनी प्रास्ताविकात आमदार पाटील यांनी दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. नाना वाघ यांनी सूत्रसंचालन केले. गणेश पाटील यांनी आभार मानले.