जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । शिवसेना आणि राणे पिता-पुत्र यांच्यात नेहमी शाब्दिक टीका-टिप्पणी सुरु असते. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू, अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच भाजपचे नेते गिरिश महाजन यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार टीका केली.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती होती. गुलाबराव पाटील यांच्यासारखे खंबीर नेतृत्व जिल्ह्याला लाभले असल्याचे सांगत मंत्री राऊत यांनी ऑनलाईन मनोगतात मंत्री पाटील यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
नेमकं प्रकरण काय?
नितेश राणे यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत टीका केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरुन उरतील. असे अनेक ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला गुलाबरावांनी सडेतोड आणि खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. “नितेश राणे कोण आहे? हे नितेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेले पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?”, अशा शब्दांत गुलाबरावांनी निशाणा साधला.
‘…तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता’
वीज उपकेंद्राच्या कार्यक्रमाप्रसंगी मनोगतात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातल्या तत्कालीन पालकमंत्री गिरिश महाजन यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. “शंभर कोटी रुपये डीपीडीसीतून जिल्ह्यासाठी देणारा मी एकमेव पालकमंत्री असल्याचे स्पष्ट केले. एकहाती सत्ता असतानाही माजी पालकमंत्र्यांना जमले नाही. केवळ राजकारण करुन अधिकार्यांना धमकाविणे एवढेच काम त्यांनी त्यांच्या काळात केले. त्यांनी निधी दिला असता तर जळगाव शहराचा सत्यानाश झाला नसता”, असेही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले