जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । तुमच्या एका जिल्ह्यातील वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली आहे.
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीए. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घाला, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो, असेही ना. पाटील म्हणाले.