गुलाब पाटील गलीच्छ भाषा करतात, चिमण आबा थुईथुई करतात : सुषमा अंधारेंचा टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । राज्यात महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने विविध ठिकाणी सभा घेत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे संभाजीनगरात पोहचल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर आणि पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधतांना शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. आ.जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेवरून त्यांनी, गुलाब पाटील थेट सांगतात कि बाई आहे म्हणून सोडून देतो, अशी गलीच्छ भाषा करतात त्यांचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच चिमण आबांचं वय ७३ आहे. त्यांना सभेत उचलून धरावं लागतं. तिथे गेले की थुईथुई करतात. हा चमत्कार कशाचा आहे. सत्तेचाच, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या दोन दिवसात भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्येच धुसफूस सुरू आहे. किरीट सोमय्या कष्टाळू आहेत. वाशिमला गेले. पुण्यात मार खाल्ला. किती कष्ट केले, त्यांना मंत्रिपदच द्यायला हवं. केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि पंकजा मुंडे यांना काय दिलं? बाहेरची लेकरं येतात त्यांना आंगडंपांगडं. स्वत:ची लेकरं मात्र उपाशी. भाजपचं म्हणजे बाहेरची बनारसी आणि घरची उपाशी, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गटातील इनकमिंग हे चमकोगीरी आहे. आमच्या गटात १८ पगड जातीमधील लोक प्रवेश घेत आहेत. मी आजवर कुणावर टीका केली नाही. कुणाबद्दल अपशब्द काढला नाही, तरीही आमच्यावर टीका केली जाते. राज्यातील सध्याचे सरकार अधिककाळ चालणार नाही. हे सरकार २०२३ ला पडणार आणि त्यानंतर राज्यात निवडणुका लागतील असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर बोलत त्यांनी माझ्या वैयक्तिक गोष्टी मी बघेल पण त्यापेक्षा राज्यातील इतर मुद्दे महत्वाचे आहे. कोल्हापूर शाहूनगरी आहे. कोल्हापूरकर प्रचंड प्रगल्भ आहेत. विरोधक खड्डे तयार करीत आहे. मी कर्तृत्वावर बोलते आणि वागते असे त्या म्हणाल्या.

गुरुवारी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांचा जोरदार पाहुणचार घेतला. आमच्याकडून जे ४० आमदार गेले त्यांनी यापूर्वीही दोन ते तीन वेळा उड्या मारल्या आहेत. त्यांची तशी फितरतच आहे. सगळ्या पक्षांमध्ये उताणे पडल्यावर ते आमच्या पक्षात आले. लढले आणि जिंकले. आता आमची बिल्ली आम्हालाच म्याव करतेय. तिकडे जाऊन नाचत आहेत. त्यांना आता नाचण्यासाठी लग्नातच बोलवा, असा हल्ला त्यांनी चढवला. टीव्ही ९ ने या पत्रकार परिषदेबद्दल सविस्तर वृत्त दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर टीका करीत सुषमा अंधारे म्हणाल्या, चिमण आबांचं वय ७३ आहे. त्यांना सभेत उचलून धरावं लागतं. तिथे गेले की थुईथुई करतात. हा चमत्कार कशाचा आहे. सत्तेचाच, असा टोला त्यांनी लगावला. मी खोक्यांवर कधीच बोलत नाही. मला त्याचं काही घेणंदेणं नाही. गद्दारी केलेल्या माणसांनी फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला नाही तर मतदारांचाही केला. तिकडे गेले आणि गब्बर झाले. जागा कशी घेतात? पैसे कुठून येतात? असा सवाल त्यांनी केला.

एवढी मोठी खेळी खेळणे एकटे एकनाथ शिंदे यांच्या बसची बात नव्हती, पडद्यामागील खरे हिरो देवेंद्र फडणवीस होते. चंद्रकांत पाटील तर म्हणे आम्ही मनावर दगड ठेवला आणि संधी दिली. आमच्या वहिनीबाई फार बोलतात. देवेंद्रजी हुडी घालू जायचे. मला पण माहिती नसायचं कुठे जातात, असं अमृता वहिनी सांगायच्या, असा टोला त्यांनी लगावला. तुम्हाला काही अडचण होती. तर तुम्ही ४० जणांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायचं होतं. पक्षप्रमुख चुकत आहेत हे पत्रकार परिषदेत सांगायचे होते, तुम्ही असे का केले नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.