जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । देशभरात महागाईने कळस गाठला आहे. आधीच सर्वसामान्य महागाईने होरपळून निघत असता त्यातच आता १८ जुलैपासून दैनंदिन वस्तूवर जीएसटी (GST) लावला जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. येत्या 18 जुलैपासून ब्रँड नसलेले प्री-पॅक केलेले अन्नधान्य, डाळी आणि तृणधान्ये तसेच प्री-पॅक केलेले दही, बटर मिल्क आणि लस्सी यांच्यावर पाच टक्के कर लावला जाणार आहे. तर त्याचवेळी काही वस्तू स्वस्त होणार आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या महाग?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या वस्तूंवरील सूट संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागणार आहे. मात्र, ज्या वस्तू पॅक केलेल्या नाहीत किंवा कोणत्याही ब्रँडमध्ये समाविष्ट नाहीत त्यांना जीएसटीमधून सूट दिली जाईल.चला जाणून घेऊया 18 जुलैपासून कोणती वस्तू स्वस्त होणार आणि कोणती महाग होणार?
या वस्तू महागणार?
प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध आणि धान्य यांच्यावरील जीएसटी सूट आता रद्द करण्यात आली आहे. या वस्तूंवर ५ टक्के दराने जीएसटी लागू होईल.
सोमवारपासून चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.
आता 5,000 रुपयांच्या वर असलेल्या रुग्णालयाच्या खोलीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. यावर ५ टक्के जीएसटीभरावा लागेल.
मॅप, अॅटलस आणि ग्लोबवर १२ टक्के दराने जीएसटी लागू होईल.
एलईडी लाईट, फिक्स्चर आणि एलईडी दिवे यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. आता यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यापूर्वी या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी होता.
ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे इत्यादींवरील जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे.
छपाई, लेखन किंवा शाई
इलेक्ट्रिक वॉटर पंप आता महाग होणार आहेत. सायकल पंपाची किंमतही वाढणार आहे. आता त्यांच्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे
गिरण्या, पवनचक्की, पाणचक्की यांमधील धान्याची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना अधिक जीएसटी भरावा लागेल.
अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी यंत्रे आणि डेअरी उद्योगात वापरल्या जाणार्या यंत्रांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.
सोलर वॉटर हिटरही महागणार आहेत.
तयार लेदर आणि कंपोझिशन लेदरवर १२ टक्के जीएसटी लागू होईल.
१००० रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्यांवर १२ टक्के कर आकारला जाईल. यापूर्वी यावर सवलत होती.
रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमी इत्यादींच्या करारांवर १८ टक्के जीएसटी लागू होईल.
या वस्तू स्वस्त होतील
18 जुलैपासून रोपवेद्वारे प्रवासी आणि वस्तूंची वाहतूक स्वस्त होणार आहे, कारण त्यावरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरणे, बॉडी प्रोस्थेसिस, बॉडी इम्प्लांट्स, इंट्राओक्युलर लेन्सवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
इंधनाच्या किमतीवरून मालवाहतूक करणाऱ्या ऑपरेटर्सच्या भाड्यावर जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येणार आहे.
संरक्षण दलांसाठी आयात केलेल्या काही वस्तूंवर IGST लागू होणार नाही.