प्रवाशांना मोठा दिलासा; रेल्वे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार धावणार, दरही पूर्ववत होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । तब्बल २० महिन्यानंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या एक्स्प्रेस, मेल ट्रेन, स्पेशल ट्रेनच्या दरात चालवण्यात येत होत्या. आता मात्र, रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार धावणार आहे. तिकिट दरही पूर्ववत करण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये 1700 हून ट्रेन पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. मात्र, रेल्वे प्रवास करताना कोविड-19 चे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू असणार आहेत. तिकिट दर कमी झाल्यामुळे आणि रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आगाऊ आरक्षित तिकिट दरांचे काय ?
रेल्वेच्या परिपत्रकानुसार, आधीच आगाऊ आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणारही नाहीत आणि अतिरिक्त शुल्क पुन्हा प्रवाशांना देण्यातही येणार नाही. विशेष ट्रेन म्हणून विशेष तिकिट दर आकारण्यात आले होते. या रेल्वेचे तिकिट दर प्री-कोविड काळातील असणार आहे.
कोरोना महासाथीच्या काळात 25 मार्च 2020 पासून रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. कोरोना महासाथीमुळे रेल्वेच्या 166 वर्षामध्ये पहिल्यांदा रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र, या दरम्यान मालवाहतूक सुरू होती. त्यानंतर मे 2020 पासून श्रमिक स्पेशल ट्रेन आणि त्यानंतर स्पेशल ट्रेनच्या रुपाने भारतीय रेल्वे पुन्हा सुरू झाली. मात्र, या स्पेशल ट्रेनचे दर अधिक असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती.