⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

ऑटोस्विच’मुळे कृषिपंपाच्या रोहित्रांमध्ये बिघाड; महावितरण : कॅपॅसिटर बसविण्याचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ ।  कृषिपंपधारक शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ सुरू होण्यासाठी कृषिपंपांना ऑटोस्विच बसविले आहेत. मात्र, हे ऑटोस्विच कृषिपंप एकाच वेळी सुरू झाल्यावर रोहित्रावरील भार वाढवत आहे. परिणामी रोहित्र जळणे आणि विद्युतवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महावितरणचे नुकसान होत असून, वीजपुरवठा खंडित झाल्यावर शेतकरी बांधवांचेही आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हा प्रकार  टाळण्यासाठी कृषिपंपधारक शेतकरी बांधवांनी कृषिपंपांना ऑटोस्विचऐवजी कपेंसिटर बसविण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

कॅपॅसिटरमुळे कमी दाबाचा वीजपुरवठा, रोहित्र जळाल्यास वा नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती कालावधीतील खंडित वीजपुरवठा या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, बहुतांश ग्राहकांनी कृषिपंपास कॅपॅसिटर बसविलेले नाहीत. बसविलेल्यांपैकी काहींचे बंद आहे.

काय आहे ‘कॅपॅसिटर’

कॅपॅसिटर हे महत्त्वाचे उपकरण आहे. कृषिपंपास कॅपॅसिटर बसविल्यामुळे विद्युत केबल जळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच यामुळे विद्युतदाब आणि वीज वापरात बचतही करता येते.

काय आहे ऑटोस्विच

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शेतात जाऊन, कृषिपंप चालू करण्याचा ग्रास वाचवण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्थिच लावले आहेत. त्यामुळे वीज येताच कृषिपंप आपोआप चालू होतो. परिणामी रोहित्रांवरील भार एकाचवेळी वाढून रोहित्र जळण्याचे आणि बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत.

काहींनी थेट जोडणी केली असल्याने ज्यांनी कॅपॅसिटर बसविले नाहीत त्यांनी ते बसवून घ्यावेत आणि कॅपॅसिटर बंद किंवा थेट जोडणी असल्यास ते दुरुस्त करून घ्यावेत, असे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.