⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

हरभऱ्याला ‘या’ बाजार समितीत मिळतोय 10 हजारापेक्षा अधिक दर ; शेतकरी आनंदित..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२४ । हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रमुख बाजारपेठ असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बाजार समितीत हरभऱ्याला पहिल्याच आठवड्यात प्रतिक्विंटल १० हजार ४०० रुपयांचा दर मिळाला आहे. बुधवारपर्यंत प्रतिक्विंटल १० हजार ४०० रुपयांचा भाव कायम असून, १ हजार ५०० क्विंटलची आवक शहादा बाजारात झाली होती. या विक्रमी भावामुळे शेतकरी आनंदित झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने हरभरा पेरणी क्षेत्र १८ हजार हेक्टरपेक्षा कमी झाले होते. नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध पाण्याच्या बळावर पेरणी केलेला हरभरा गेल्या १५ दिवसांपासून काढणीवर आला आहे. काढणी केलेल्या हरभऱ्याची मळणी केल्यानंतर शेतकरी बाजारात आणत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात हरभरा खरेदीची सर्वाधिक प्रमुख बाजारपेठ असलेल्या शहादा बाजार समितीत गत आठवड्यात खरेदीला प्रारंभ झाला. यातून पीकेव्हीटू या वाणाला प्रतिक्विंटल १० हजार १०० रुपयांच्या दरांपासून प्रारंभ झाला. हे दर दोन दिवसांनी वाढ जाऊन बुधवारी १० हजार ४०० रुपयांवर स्थिरावले आहेत. जिल्ह्यातील ८०: टक्के हरभरा उत्पादक शेतकरी शापा, हैदराबादी यासह विविध वाणांची लागवड करतात. शहादा बाजारात आतापर्यंत १ हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी होत आहे. दर दिवशी ३०० क्विंटल आवक सध्या सुरू आहे.

यात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. गत तीन वर्षांत हरभऱ्याचे दर प्रथमच १० हजारांच्या पार गेल्याची माहिती देण्यात आली आहे. शहादा बाजारात मिळत असलेल्या वाढीव दरांमुळे लगतच्या धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हरभरा विक्रीसाठी शहाद्याकडे येत आहेत. शहादा बाजार समितीत हरभरा तेजी पकडत असताना नंदुरबार बाजार समितीतही खरेदीत वाढ झाली आहे. बुधवारी नंदुरबार बाजारात पीकेव्हीटू १० हजार ७०, शापा ५ हजार ८३२, तर हैदराबादी हरभरा वाणाला प्रतिक्विंटल ७ हजार रुपयांचा दर देण्यात आला होता. नंदुरबारात आतापर्यंत ५०० क्विंटल आवक आहे.