⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

राज्यपाल सरकार : शिंदे गटाला सरकार स्थापनेची संधी? भाजपने बोलावली बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । राज्यातील राजकारणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका विधानाने मोठी हालचाल सुरु झाली आहे. शिवसेनेने १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या प्रस्तावावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने बंडखोर आमदारांना आपले उत्तर देण्यासाठी १२ जुलैपर्यंत वेळ वाढवून दिला आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्षांना देखील आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी ५ दिवसांचा वेळ दिला आहे. दरम्यान, बहुमत चाचणीबाबत न्यायालयाने कोणताही आदेश दिला नसल्याने एकनाथ शिंदे गटाकडून राज्यपालांना मविआ सरकार अल्पमतात असल्याचे पत्र देत बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. राज्यात सुरु असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबईत सागर बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.

राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला असून शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे ३९ आमदार घेऊन बाहेर पडले आहे. एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेत बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी १२ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी आणखी चार आमदारांना अशा एकूण १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर गटातील १६ आमदारांना अपात्रेची नोटीस बजावली. आमदारांच्या घरावर देखील नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाने नोटीसला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दुपारी सुनावणी पार पडली असून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेत न्यायालयाकडून शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत अपात्र ठरविता येणार नसून आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी दि.१२ जुलै रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आपले उत्तर लेखी सादर करता येणार आहे. न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्षांना नोटीस बजावली असून त्यांना अविश्वास आणि संपूर्ण प्रकरणाबाबत ५ दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी दि.११ जुलै रोजी होणार आहे. वकील निरज किशन कौल यांनी एकनाथ शिंदे गटाकडून युक्तीवाद केला तर महाविकास आघाडीतर्फे वकील मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला.
हेही वाचा : Eknath Shinde Updates : हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी… बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठविले खरमरीत पत्र…

सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीबाबत एक महत्त्वाचं विधान केले असून बहुमत चाचणीबाबतचं प्रकरण कोर्टासमोर आलेलं नाही. त्यामुळे ती रोखण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. चाचणीत काही आक्षेप घ्यावेसे वाटले तर कोर्टाचे दरवाजे नेहमी उघडे आहेत. तेव्हा तुम्ही दाद मागू शकता, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने विश्वासदर्शक ठराव घेण्यास कोणतीही मनाई केली नाही. मात्र, आमदारांना अपात्र न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळाला असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

कोर्टाने आमदारांना दिलासा दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे गट मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत दिसत आहे. गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटाने मोठा जल्लोष केला आहे. शिंदे गट उद्या सकाळी राज्यपालांना पत्र पाठविण्याची शक्यता असून आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला असल्याचे ते नमूद करणार आहेत. शिंदे यांनी राज्यपालांना पत्रं दिल्यानंतर राज्यपाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या राज्यपालांच्या हाती सर्व सूत्रे असल्याचे बोलले जात असून राज्यपाल आपल्या अधिकारांचा उपयोग करू शकतात असे म्हटले जात आहे. शिंदे यांचे पत्रं मिळताच राज्यपाल मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी सांगू शकतात तसेच या विषयावर दि.११ जुलै पूर्वीच बहुमत सिद्ध करण्यास देखील सांगू शकतात अशी शक्यता आहे. शिंदे गटाच्या खेळीमुळे शिवसेनेची कोंडी होऊ शकते. कारण सध्या तरी सर्व निर्णय हे राज्यपालांच्या हातात एकवटले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सत्ता संघर्ष लवकरच संपुष्ठात येण्याची शक्यता आहे. गुवाहाटी येथी एकनाथ शिंदे गटाने मोठा जल्लोष केला असून राज्यात मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपची कोअर कमिटीची बैठक सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगुंटीवार, पंकजा मुंडे आदी बैठकीत उपस्थित असल्याचे समजते. बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.