गोरसेनेने काढला खासदार, आमदारांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून ओबीसींच्या विविध समस्या सोडविण्यात याव्या, यासह विविध मागण्यांसाठी सोमवार दि.१५ रोजी गोरसेनेच्यावतीने खासदार, आमदार यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. जळगाव शहरात आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ओबीसी प्रवर्गातील नागरीकांची जाती निहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गातील नागरीकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणामध्ये वाटा देण्यात यावा, मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार २७% आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी व भटक्या विमुक्त समुदायाचे पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी गोरसेनेच्यावतीने सोमवार दि.१५ रोजी चाळीसगाव व जळगाव येथे निषेध मोर्चा काढण्यात काढण्यात आला. चाळीसगाव येथे खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांना जळगावात आमदार सुरेश भोळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोरसेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राज्यभर हे आंदोलन करण्यात आले.
निवेदन देतेवेळी गोरसेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष माधव राठोड, सचिव चेतन जाधव, शाम राठोड, चाळीसगाव तालुका अध्यक्ष देविलाल राठोड, संयोजक सुकदेव राठोड, नरेंद्र राठोड, शहर अध्यक्ष सुनिल चव्हाण, सनी चव्हाण, अभिजित चव्हाण, अनिल राठोड, सुरेश राठोड, विशाल चव्हाण यांसह गोरसेना व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.