जळगाव लाईव्ह न्यूज | १ एप्रिल २०२३ | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये एका किराणा दुकानात कामाला असलेल्या नोकराने तब्बल ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा माल परस्पर विकून पैशांचा गैरव्यवहार केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्या फरार संशयिताला गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील जावई गल्लीत नंदकिशोर भागवत शिंदे (वय ४३) यांचे श्री समर्थ कृपा किराणा दुकान आहे. दुकानात विशाल शरद पाटील कामाला होता. ५ फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान विशाल याने वेळावेळी किराणा दुकानातून तब्बल पाच लाख ६९ हजार ५३० रुपयांचा किराणा चोरून नेला व तो परस्पर विक्री केला.
ही बाब लक्षात आल्यावर मालक भागवत शिंदे यांनी १४ मार्चला दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच संशयित फरारी झाला हेाता. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळालेल्या माहितीवरून इम्रान सय्यद, साईनाथ मुंडे, योगेश बारी, सुधीर साळवे यांनी विशाल पाटील याला पुण्यात अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड जप्त केली. त्यास जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश जे. एस. केळकर यांनी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.