⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

शुभवार्ता : एसटीची चाके पुन्हा येताय रस्त्यावर, २५ कर्मचारी परतले कामावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । राज्य शासनात विलीनीकरणाचा निर्णय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ दिल्यानंतर कामावर परतण्याबाबत रविवारी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जळगाव व भुसावळ आगारातील संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समुपदेशन केले.  अधिकाऱ्यांनी केलेल्या समुपदेशनानंतर जळगाव व भुसावळ आगारातून दिवसभरात बारा बसेस बाहेरगावी गेल्या, तर या दोन्ही आगारातील मिळून २५ कर्मचारी कामावर परतले.

एस.टी. कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी ७ नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महामंडळाची सेवा ठप्प आहे. तसेच महामंडळाचेही करोडो रुपयांचे आर्थिक उत्पन्न बुडत आहे. विलीनीकरणाच्या निर्णयावर २० डिसेंबर रोजी न्यायालयात निर्णय होणार असल्यामुळे, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी महामंडळाने दिलेली वेतनवाढ स्वीकारून कामावर येण्याबाबत विभाग नियंत्रक भगवान जगनोर व विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी रविवारी जळगाव आगारातील व भुसावळ आगारातील संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. न्यायालयाचा निकाल जो लागेल त्यानुसार कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे न्याय देण्यात येणार असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. त्यानुसार जळगाव व भुसावळ आगार मिळून २५ कर्मचारी तत्काळ कामावर आले आणि बाहेरगावी बसेस नेल्या

समुपदेशनाला प्रतिसाद

विभाग नियंत्रकांनी व विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून, कामावर येण्याचे आवाहन केल्यानंतर रविवारी जळगाव व भुसावळ आगारातील मिळून २५ कर्मचारी कामावर परतले. या कर्मचाऱ्यांच्या मदतीने जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पाचोरा या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या, तर भुसावळ आगारातून जळगाव, बोदवड व मुक्ताईनगर येथे बसेस सोडण्यात आल्या. दिवसभरात बारा बसेस आगाराबाहेर पडल्या ●असल्याचे सांगण्यात आले.