⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गट शेतीतून मधमाशी पालनास चांगले दिवस – डॉ. प्रशांतकुमार पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । कृषी विज्ञान केंद्र, जळगाव येथे राष्ट्रीय मधमाशी मंडळ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसीय “शास्त्रोक्त मधमाशी पालन” प्रशिक्षण कार्यक्रम समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी गटशेतीतून मधमाशीपालन उद्योगास चांगले दिवस येतील असे मत व्यक्त केले.

तरुणांना मधमाशी पालना करीता प्रोस्ताहित करून हरितक्रांती व दुग्धक्रांती प्रमाणे मधुक्रांतीसाठी प्रेरित केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अधिष्ठाता कृषि, मा. डॉ. प्रमोद रसाळ यांनी मधमाशीपालन हा शेतीस पूरक व्यवसाय ठरत असल्याबाबत मत व्यक्त केले व यासारखे प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा आयोजित करण्याबाबत सूचित केले. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक डॉ. चिदानंद पाटील, विभाग प्रमुख, कृषि कीटकशास्त्र विभाग, यांनी केले तसेच डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले.

राष्ट्रीय मधमाशी मंडळ, कृषि सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत ‘पश्चिम महाराष्ट्रमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशीपालन, उच्च प्रतीचे मधमाशी बीज केंद्राचा विकास आणि मधु वनस्पती फुलोरा यांची लागवड’ या प्रकल्पांतर्गत कृषि कीटकशास्त्र विभाग, मफुकृवि, राहुरी यांचे द्वारे कृषि विज्ञान केंद्र, जळगाव येथे २१ ते २७ मार्च २०२२ या कालावधीत “शास्त्रोक्त मधमाशी पालन” प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील २५ शेतकरी प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते त्यांना मधमाशी पालनाचा इतिहास, मधमाशांची ओळख, मधमाशांचे प्रकार, मधमाशांचे कुटुंब, मधपेटीची शास्त्रोक्त पद्धतीने हाताळणे, मध काढणे, मधमाशीसाठी हानिकारक कीटकनाशके, मधमाशी वरील विविध कीड व रोगांचे व्यवस्थापन तसेच मधमाशी संवर्धनाविषयी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे मधपेटीचे हाताळणे, मध काढणे, मधपेटी विभाजन करणे, राणी मधमाशीचे संगोपन करणे याबद्दल क्षमताबद्ध केले. कार्यक्रमात डॉ. उमेश पाटील यांनी परपरागीभवनासाठी आवश्यक डंकविरहित मधमाशीचे प्रात्यक्षिकासह महत्व तसेच मधकेंद्रचालक तथा मधमाशी प्रशिक्षक, विद्यानंद अहिरे यांनी मधुपेटीतील मध उत्पादनाकरीता उपयुक्त एपिस मेलिफेरा (युरोपियन) मधमाशी बाबत प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले. किशोर सुरवाडे, जिल्हा विकास अधिकारी, खादी ग्रामोद्योग मंडळ व तुषार देसाई, विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प (पोकरा) यांनी मधमाशीपालनाकरीता उपलब्ध शासकीय योजनेंची माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींनी बसवंत मधमाशी पार्क व मध प्रक्रिया उद्योग येथे भेट देऊन कृषि पर्यटनातून उद्योजकता व मधमाशी पालनाबाबात प्रत्यक्ष्य माहिती अनुभवली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंत बाहेती, सागर बंड, संगेश सुर्वे, अरुण सूर्यवंशी, सतिश धनवटे, मनोज बोरसे व विशाल भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले.