शेतकऱ्यांना सुवर्णसंधी : ‘या’ योजनेत सहभागी झाल्यास महाबीज देणार बियाणे

नोव्हेंबर 30, 2021 7:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम २०२१-२२ मध्ये अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातर्फे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

farmers should keep homemade soybean seeds

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यावर्षी झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामाकरीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याचा तुटवडा येवू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशान्वये महाबीजमार्फत जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी हंगामाकरीता प्रमाणीत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम एक हजार दहा हेक्टरवर राबविण्यात येत आहे. सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रती एकर १०० रुपये भरणा करुन आरक्षण करणे आवश्यक आहे.

रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यात सोयाबीन फुले संगम, फुले किमया, एमएयूएस ६१२, २००३-२, PKVM-८८०२ आदी वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी १५ एकर क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. एका शेतकऱ्याने कमीत कमी २ एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बीजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या पायाभूत बियाण्याचा पुरवठा ‘महाबीज’ कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. बियाणे शुल्क शेतकऱ्याने बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात भरणे अनिवार्य आहे. उत्पादित सोयाबीन बियाण्याकरीता महाबीज मुख्यालयाकडून आकर्षक असे खरेदी धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची १०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पैसे भरुन १० डिसेंबरपर्यंत आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे.

या क्रमांकावर करा संपर्क
अधिक माहितीसाठी जळगाव, जामनेर, बोदवड, पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९६२४१२८००६, रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९९७५९३००१४, अमळनेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ७०८३५६९८४९ या क्रमांकावर तर पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ९९२२२९५५३९ याक्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now