जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसून आली. यातच बुधवारी जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोने दरात तब्बल १ हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह ९० हजाराच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचा दरही हजार रुपयांनी वाढला आहे. एकीकडे लग्नसराई सुरू असून यातच सोन्यासह चांदीने विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.

जळगाव सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७९८०० रुपये प्रति तोळा इतका आहे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८७,१०० रुपयांवरतर जीएसटीसह ८९७०० रुपयावर पोहोचला आहे. चांदीचा दर विनाजीएसटी ९९ हजार रुपयांवर आहे.
सोने महाग होण्यामागे कारणे
जागतिक बाजारातील अस्थिरता, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित पर्यायांकडे झुकलेली मागणी यामुळे सोने महाग होत आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांच्या मते, बँका आणि गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जात आहे. ज्यामुळे किमती सतत वाढत आहेत.
वर्षभरात सोने चांदी इतकी महाग
गेल्या वर्षी म्हणजेच २० फेब्रुवारीला जळगावात २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६२,५०० रुपये होता आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ५७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम होता.चांदीचा दरही विनाजीएसटी ७२५०० रुपये प्रतिकिलो होता. मात्र आज २० फेब्रुवारी २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ८७१०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ७९८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. म्हणजेच एका वर्षात २४ कॅरेट सोन्याचा दर २४६०० रुपयांनी तर २२ कॅरेट सोन्याचा दर २२,५५० रुपयांनी वधारले आहे. दुसरीकडे चांदीचा दर २६ ते २७ हजार रुपयांनी वाढला आहे.