⁠ 
सोमवार, मे 6, 2024

बापरे ! सोन्याने ओलांडला 70000 टप्पा, चांदीही 80 हजारांच्या उंबरवठ्यावर

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२४ । ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांना मौल्यवान धातूंनी मोठा झटका दिला. मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी उडी घेतली. तर नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीनच दिवसात सोन्याने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केले असून चांदीची किंमतही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदीची घोडदौड सुरूच राहिल्यामुळे ग्राहकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. Gold Silver Rate

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज गुरुवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झालीय. यामुळे सोने-चांदी विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. सोन्याच्या किमतीने ७० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदी ८० हजारांच्या उंबरवठ्यावर पोहोचली आहे. MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोन्याचा दर ३२० रुपयांनी वाढून ७०,१०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव ६८६ रुपयांनी वाढून ७९,६९७ रुपयांवर ट्रेंड करत आहे.

जळगावातील दर :
देशातील सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने ७० हजारांचा आकडा पार केला. ‘जीएसटी’ सह सोन्याचे दर प्रतितोळा ७१ हजार ४८२ रुपयांवर पोहचला आहे. दुसरीकडे जळगाव येथील सराफा बाजारात चांदीच्या दरात पण मोठी वाढ झाली आहे चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असून मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या किंमतीत दरवाढ सुरू झाली जी आता नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसात नव्या शिखरावर पोहोचली आहे. दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या फ्युचर किंमतीत मोठी वाढ दिसून येत असून सोन्याच्या दराने उच्चांक गाठला तर चांदीच्या फ्युचर्सच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत.