⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

साडेपाच महिन्यांनंतर सोन्याने गाठला ‘हा’ टप्पा ; एकाच दिवसात झाली 600 रुपयाची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । मागील गेल्या काही काळापासून सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत बराच बदल होत असल्याचे दिसून येतेय. दोन वर्षांपूर्वी रशिया युक्रेन युद्धानंतर प्रथमच ६० हजारांचा टप्पा गाठणारे सोने घसरून काही दिवसापूर्वी ५७ हजारांपर्यंत खाली गेले होते. पितृपक्षामुळे सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली. मात्र आता पुन्हा पितृपक्षानंतर सोने तेजीत आले आहे.

महिन्याभरापूर्वी सोन्याचे दर ५७ हजार रुपये प्रति तोळा असताना जाणकारांनी दिवाळीत ते ६२ हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, दिवाळीला आता दोन आठवड्याचा कालावधी उरला असतानाच काल शनिवारी सोन्याच्या दराने ६२ हजारांचा टप्पा पार करत ते ६२२०० रुपयांवर पोहोचले आहे. शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ६०० रुपयांची वाढ झालेली दिसून आली. दिवाळीत सोने ६४ हजारांची मजल मारेल असा नवा अंदाज अभ्यासकांचा आहे

तर दुसरीकडे चांदीच्याही भावात शनिवारी ८०० रुपयांची वाढ झाल्याने ती तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा ७३ हजारांवर पोहचली.शनिवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढून ८३.४१ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोने-चांदीच्याही भावात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पितृपक्षामध्ये सोने आणि चांदी खरेदीकडे अनेकांनी पाठ दाखविली. यादरम्यान मागणी नसल्याने दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली. या महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून ५७ हजारावर आला होता. तर चांदीचा दर ६८ हजारावर आला होता. मात्र त्यांनतर ८ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या इस्त्राईल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे सोने आणि चांदीच्या कितमीत वाढ दिसून आलीय.

मागील आठवड्यात सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केल्यानंतर शनिवारी ६०० रुपयांची वाढ होत ते आता ६२२०० रुपये तोळा झाले आहे. यापूर्वी ५ मे २०२३ रोजी सोने ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. त्यानंतर मात्र त्याचे भाव कमी झाले होते. आता पुन्हा एकदा भाववाढ होऊन साडेपाच महिन्यांनंतर सोने ६२ हजारांच्या पुढे गेले.