सोन्यासह चांदीने घेतली मोठी भरारी, लग्नसराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फुटणार घाम
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । दिवाळीपासून सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा महागाईचा सूर आळवला. उद्यापासून म्हणजेच 27 नोव्हेंबर पासून लग्नाची धामधूम सुरु होणार आहे. मात्र त्याचपूर्वी सोने चांदीने मोठी झेप घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. सध्या सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 62 हजार रुपयांवर गेला तर चांदीचा दर 75 हजार रुपयांवर गेला आहे. Gold Silver Rate Today
दिवाळीपासून सोन्याने मोठी भरारी घेतली. या काळात सोने 1500 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 20 नोव्हेंबरला सोने 50 रुपयांनी स्वस्त झाले. 21 नोव्हेंबरला 380 रुपयांची झेप घेतली. 23 नोव्हेंबर रोजी किंमती 50 रुपयांनी उतरल्या. 25 नोव्हेंबर रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने या दोन आठवड्यात मोठी भरारी घेतली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीने 5600 रुपयांची उसळी घेतली. 21 नोव्हेंबर रोजी किंमती 400 रुपयांनी वाढल्या. 22 नोव्हेंबर रोजी किंमतीत 400 रुपयांची घसरण झाली. 23 नोव्हेंबर रोजी 200 रुपयांची भाव वाढ झाली. 25 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,200 रुपये आहे.