जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या (Gold) दरात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 48 हजार 100 रुपये इतकी झाली आहे. तर शुक्रवारी 22 कॅरट सोन्याची किंमत 47,650 इतकी होती. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत 450 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचा (silver) आजचा दर 68 हजार 807 रुपये प्रति किलो एवढा आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये मोठी उलाढाल पहायला मिळत आहे, गेले दोन वर्ष कोरोनामुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता व त्यामुळे सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प होते. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याला मागणी वाढल्याने काहीप्रमाणात सोन्याच्या भाव वधारल्याचे दिसून येत आहे. जळगावमध्ये 24 कॅरट सोन्याचे भाव 51 हजार 225 प्रति ग्रॅम आहे. तर चांदी भाव 68 हजार 807 रुपये प्रति किलो आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज गुढीपाडव्यामुळे सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.