अनोळखी इसमाला ओटीपी देणे तरुणाला पडले महागात; वाचा किती हजारात झाली फसवणूक
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२१ । एका अनोळखी इसमाला ओटीपी देणे जळगावातील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्या अनोळखी इसमाने तरुणाच्या खात्यातून तब्बल ९३ हजार रुपये एका बँक खात्यावर वर्ग करून घेत, तरुणाची फसवणूक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन निंबाजी गुंजाळ (रा. निमखेडी शिवार, जळगाव) यांचे दर्शन कॉलनी येथे दूध विक्रीचे बूथ असून २७ सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आपण फोन-पे कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्या अनोळखी इसमाने तुमचे शेवटचे ट्रान्झेकशन किती रुपयाचे होते, अशी विचारणा केली. त्यावर गुंजाळ यांनी २ हजार रुपयांचे होते असे सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तुमचे दोन हजारांपैकी एक हजार रुपये फोन-पे कंपनीकडे अडकले आहेत, ते मी टाकून देतो, त्यासाठी लिंक पाठवितो, त्यावर आलेला ओटीपी क्रमांक मला सांगावा, असे त्याने सांगितले. गुंजाळ यांनी त्या इसमावर विश्वास ठेवून आलेला ओटीपी संबंधित व्यक्तीला सांगितला. काही वेळानंतर गुंजाळ यांना त्यांच्या खात्यातील ९२ हजार ९१९ रूपये कुणाच्या तरी बँक खात्यात वर्ग झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच बँकेत जाऊन खात्री केली असता, त्यांच्या बँक खात्यातून ९२ हजार ९१९ रुपयांची रक्कम कुणीतरी काढून घेतल्याचे आढळून आले. ओटीपी विचारून आपली फसवणूक झाल्याचे गुंजाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी तालुका पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.