सामाजिक शास्त्र प्रशाळेला अनुदान द्या, विद्यार्थ्यांची मागणी!
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेला अनुदान घ्यावे, अशी मागणी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जळगावातील आदिवासी मुलांचे शासकीय इमारतीच्या वसतिगृहाचे उद्घाटन शुक्रवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विध्यापीठाच्या सिनेट हॉल मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेत जळगावसह नंदुरबार व धुळे या जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असून बहुतांश विद्यार्थी हे सातपुड्यातील आहेत. मात्र, एकाच विषयाला नियमीत प्राध्यापक असून इतर सर्व विषयांचे प्राध्यापक हे कंत्राटी पद्धतीने आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रशाळेला अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
या प्रसंगी मनीषा पवार, नयना पावरा, श्रावण वसावे, सुनिल बारेला, प्रताप पावरा, अश्मा पावरा, कविता ठाकरे, पिंकी वसावे, प्रियासी बरिला, जानु पावरा, निमा पावरा पिंच्या पावरा आदी विद्यार्थी उपस्थित होते.