जळगाव लाईव्ह न्यूज । इराण-इस्रायल युद्धाच्या तणावाचे पडसाद आता देशासह महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्याचे दिसत असून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहे. अशातच घरगुती गॅस सिलेंडर वितरण प्रणालीत सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.

नव्या नियमांनुसार दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधीत वाढ केली गेली आहे – शहरात आता ४० दिवस, ग्रामीण भागात ४५ दिवस नंतरच नवीन सिलेंडर बुक करता येणार आहे. याआधी हे अंतर फक्त २५ दिवसांचे होते. या बदलामुळे नागरिकांना गंभीर अडचण निर्माण झाली.

सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन समस्या निर्माण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळेच आता सामान्य माणूस गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहे. मोबाईलवरून गॅस बुकिंग होत नसल्यामुळे आता थेट गॅस एजन्सीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. एकूणच सामान्य माणूस या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त झाल्याचे चित्र दिसतेय. दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती वितरक कंपन्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे.
१० मार्च रोजी घरगुती वापरासाठी १८ हजार १६८ ग्राहकांना सिलिंडर सहज उपलब्ध झाले असून, वितरकांकडे अजूनही २९ हजार ०६६ सिलिंडरचा साठा असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे जळगावातील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, साठा उपलब्ध नसल्याची बतावणी करून सिलिंडर घरपोच करणारी काही मंडळी ‘खुशाली’ कमवत असल्याचा प्रकारही समोर येताना दिसत आहे.







