⁠ 
रविवार, मे 5, 2024

महाराष्ट्रात गारठा वाढला! कुठे किती तापमान? वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२३ । पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे. राज्यातील जळगावसह अनेक भागात गारठा वाढला असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज तापमानात काही प्रमाणात चढ उत्तर होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही गारठा कायम राहणार आहे.

जळगावमध्ये मागील दोन दिवसांपासून दिवसा वारे ताशी १२ ते १८ किलोमीटर वेगाने वाहताहेत. यामुळे जळगाव कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढू शकतो. मंगळवारनंतर आकाश किंचित ढगाळलेले असेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचं मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा 15 अंशावर आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळख असलेल्या निफाड (Niphad) तालुक्यात 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे . राज्याची राजधानी मुंबईतही हवामानात गारठा वाढला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 18.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागातील तापमानात घट झाली आहे. पुण्यातही गारवा वाढला असून किमान तापमान 11.3 अंशांवर गेले आहे.

कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव – 12.6
संभाजीनगर – 11.8
पुणे – 11.3
निफाड – 9
सातारा – 13.4
सांगली – 14.2
नांदेड – 15
नाशिक – 13.6
जालना – 13.6
कोल्हापूर – 16.3
सांताक्रुज – 18.9
महाबळेश्वर – 15
धुळे – 8
परभणी – 12.2
सोलापूर – 15.9
धाराशिव – 15.4
बारामती – 11.4
रत्नागिरी – 20.5
माथेरान – 19.4
बीड – 12