जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । धरणगाव शहरासह परिसरातून चोरीच्या गेलेल्या सात दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.
गोकुळ काशिनाथ गवारे (रा.समर्थनगर, धरणगाव) यांच्या फिर्यादीवरुन ३० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची दुचाकी, रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी झाल्याने धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात, सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी तपास केला. गोपनीय विभागाचे कर्मचारी वैभव बाविस्कर, शामराव भिल व प्रमोद पाटील यांनी संशयित यश दिनेश सातपुते, तुषार महेंद्र बत्तीसे, वैभव उर्फ विकी हेमंत चौधरी, मनीष ऊर्फ भुऱ्या योगेश चौधरी, सय्यद पीरण सय्यद मुक्ता, वैभव उर्फ दादू सुरेश मोरे, हसन उर्फ अली मोहम्मद शेख, आणि वसीम शेख बिस्मिल्ला (रा. धरणगाव) या सात जणांना ताब्यात घेतले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या चार दुचाकी व तीन दुचाकींचे स्पेअर पार्ट धरणगाव आणि धुळे येथून जप्त केले. याप्रकरणी सातही संशयितांना अटक केली आहे.