जळगाव लाईव्ह न्यूज । बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या महिला टोळीचा पाचोरा पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून ३२ हजार ४०० रुपयांची चोरीची रोकड जप्त करण्यात आली आहे. निर्मला सुनील जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, ता. जामनेर), सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. कुंभारी, ता. जामनेर; मूळ रा. भोकरदन) व उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, ता. जामनेर) असं अटक केलेल्या महिलांची नावे आहे.

याबाबत असे की, पाचोरा तालुक्यातील वडगाव खुर्द येथील ७० वर्षीय वृद्ध शेतकरी श्रावण ताराचंद पाटील हे ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी पाचोरा बसस्थानकातून बसमध्ये चढत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून १३ हजार ४०० रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, २३ नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (DB) कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. पाचोरा बसस्थानक परिसरात तीन संशयित महिला प्रवासी महिलांची टेहळणी करत असून त्या पिकपॉकेट (खिसेकापू) असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले.

महिला पोलीस अंमलदारांनी या महिलांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चोरीची रक्कम मिळून आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून अनुक्रमे १३ हजार ५०० रुपये, ६ हजार ६०० रुपये आणि १२ हजार ३०० रुपये असा एकूण ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरातील चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.









