⁠ 

Gandhi Teerth : अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, दुबईसह अनेक देशांचे लोक म्हणतात, इनक्रेडिबल जळगाव… इनक्रेडिबल इंडिया…

जळगाव लाईव्ह न्यूज | Gandhi Teerth, Jalgaon | सुवर्णनगरी, केळी व कापसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या जळगावला गांधी तीर्थामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. गेल्या १०-११ वर्षात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, अफगानिस्तान, दुबई, श्रीलंकेसह अनेक देशातील नागरिकांनी गांधी तीर्थला भेट दिल्यानंतर इनक्रेडिबल इंडिया अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याची गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या व्हिजिटर डायरीमध्ये नोंद आहे. पद्मश्री डॉ. भवरलाल जैन (Dr Bhavarlal Jain) यांनी ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’ची (Gandhi Research Foundation, Jalgaon) स्थापना केली आणि २५ मार्च २०१२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण झाले. ६५ हजार चौरस फुटांच्या भव्य इमारतीत गांधी रिसर्च फाउंडेशन विस्तारलेलं आहे. गांथी तीर्थला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. यात परदेशी पर्यटकांची संख्या मोठी असते. हे परदेशी पर्यटक जेंव्हा मायदेशी जातात. तेंव्हा त्यांच्यामुळे जळगावचे नाव सातासमुद्रापार चर्चेत राहतं, याच कारण म्हणजे, गांधी तीर्थ!

गांधी तीर्थला भेट दिल्यावर तेथील व्हिजिटर डायरीमध्ये नोंद करतांना अमेरिकेचे डोग बर्ट म्हणतात की, गांथी तीर्थची वास्तूच गांधीजींची व भारतातीच गौरविशाळी परंपरा दाखवतात. अमेरिकेचेच बोल केथ म्हणतात की, हा प्रकल्प येणार्‍या पिढीला प्रेरणादायी आहे. दुबईचे श्री बेग म्हणतात की, गांधी तीर्थ उभारण्याची संकल्पनाच कौतूकास्पद आहे. राष्ट्रपित्याला वाहिलेली ही खरी श्रध्दांजली आहे. अफगानिस्तानचे के.बी.खान लिहितात की, गांधीजींवर लिहिलेल्या सर्व पुस्तकांपेक्षा गांधी तीर्थमध्ये अधिक माहिती उपलब्ध आहे. मेक्सिकोचे फरनॅन्डो फेरारा यांची प्रतिक्रीया अत्यंत बोलकी आहे. ते लिहितात की, चांगले रचनात्मक कार्य करणे म्हणजे, गांधीधर्म आहे. आपली क्षमता व मर्यादा न बघता प्रत्येकाने चांगले कार्य केले पाहिजे, याची प्रेरणा गाधी तीर्थमुळे मिळाली आहे. मलेशियाच्या श्रीदेवी नांबीयान म्हणतात की, गांधीतीर्थला भेट देणे हा अत्यंत सुंदर असा अनुभव आहे. श्रीलंकेचे महेशन जयमोहन म्हणतात की, गांधीजींची महतील श्रीलंकेला नवी नाही, मात्र आजला अनुभव वेगळाच होता.

जगातील एकमेव ‘ऑडिओ गाइडेड संग्रहालय’
‘गांधी तीर्थ, खोज गांधीजी की’ हे महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील जगातील एकमेव ‘ऑडिओ गाइडेड संग्रहालय’ इथलं प्रमुख आकर्षण आहे. रिसर्च फाउंडेशनमध्ये प्रवेश केल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवनाचे तीन प्रमुख कालखंड चित्रांद्वारे रेखाटण्यात आलेत. बालपणात त्यांना भावलेली व्यक्तिमत्त्वे, परदेशातलं उच्च शिक्षण, आई-वडिलांची सेवा असा प्रवास त्यातून नजरेस पडतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासादरम्यान तेथील अधिका-यांनी महात्मा गांधींना रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रसंग एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सादर केला जातो आणि याच ठिकाणी महात्मा गांधींचा निद्रावस्थेतील पुतळा जणू स्वत: गांधीजींना भेटल्याचा अनुभव देऊन जातो.

११९ देशांनी प्रकाशित केलेली टपाल तिकिट
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन केंद्रात महात्मा गांधीजींचे खासगी सचिव महादेवभाई देसाई यांनी लिहलेली दैनंदिनी, कस्तुरबा गांधी, मनुबेन गांधी यांनी लिहलेल्या दैनंदिनी, चंपारण्य सत्याग्रहाचे राजकुमार शुक्ल यांची दैनंदिनी यासह महात्मा गांधीजींवरील ११४ माहितीपट, ११९ देशांनी प्रकाशित केलेली टपाल तिकिटे, तत्कालीन कालखंडातील पिरॉडिकल्स, गांधीजी, विनोबांची ऑडीओ स्पीचेस, चित्रफितींसह गांधीजींवर डिजिटलाझेशन केलेले ४ लाख ५५ हजार ५२० दस्ताऐवज, गांधीजींना मिळालेली मानपत्रे ३८ व सन्मानचिन्ह ३३, गांधीजींचे ४,६७२ मूळ छायाचित्रे येथे पहायला मिळतात.

स्वातंत्र लढ्यासंबंधीत २ हजार १७२ छायाचित्र
तसेच गांधीजींसोबत स्वातंत्र संग्रामात सहभागी व्यक्तींचा ७४९३ छायाचित्र, स्वातंत्र लढ्यासंबंधीत २ हजार १७२ छायाचित्र, गांधीजींवर प्रसिद्ध झालेले ९१८ कार्टुन्स यासह सर्वात महत्त्वाचे म्हणजे गांधीजींनी स्वत: दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तूंचा येथे संग्रह केलेला असून त्या कायमस्वरुपी जतन केल्या आहेत. गांधी तीर्थ येथे ‘खोज गांधी जी की’ हे जगातील एकमेव ऑडियो-गाईडेड संग्रहालय आहे. ‘मोहन ते महात्मा’ हा जीवनप्रवास ऐतिहासीक दस्ताऐवजांसह अत्याधुनिक पद्धतीने सहज सोप्याभाषेतून याठिकाणी समजून घेता येतो. संग्रहालयात बाइस्कोपसुद्धा आहे. यात महात्मा गांधीजींची युवावस्था अभ्यासता येते.