जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। गोजोरे येथील चौधरी कुटुंब नातीला पाहण्यासाठी पुणे येथे गेले असता चोरट्यांनी संधी साधून घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोने- चांदीचे दागिने, बँकेचे पासबुक, असा सहा लाख १३ हजार सहाशे रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील गोजोरा येथे राहणाऱ्या मालती अभिमान चौधरी या आपले पती व विधवा मुलगी व तिच्या मुलांसह गुजरात येथे राहतात. हे संपूर्ण कुटुंब २६ रोजी मुलाला मुलगी झाल्यामुळे पुणे येथे नातीला बघण्यासाठी गेले होते.
दरम्यान, सोमवारी (ता. ७) शेजारी राहणारा चुलत भाऊ मयूर चौधरी याला घराचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे याबाबत मालती चौधरी यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली. सदरची माहिती मिळताच साकेगाव येथे राहणाऱ्या भाच्याला सर्व हकीकत सांगून पाहणी करण्यास सांगितले.
मंगळवारी (ता. ८) सकाळी गोजोरे येथे घरी पोहोचल्यावर घराची पाहणी केली असता बेडरूममधील कपाटातील मुलीचे ठेवलेले दागिने व स्वतःचे दागिने असा सहा लाख १३ हजार सहाशे रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी मालती अभिमान चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार तपास करीत आहेत.