⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून महिलेची केली साडे आठ लाखाला फसवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ ऑगस्ट २०२३। महाराष्ट्र बँक कस्टमर केअरमधून बोलत असून तुमची गेलेली रक्कम परत मिळवून देतो असे सांगत एरंडोल येथील महिलेची ८ लाख ५५ हजार ४१ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी ५ ऑगस्ट रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल येथील रहिवासी असलेल्या शर्मिला अनिल चिकाटे (५०, रा. एरंडोल) ह्या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्‍या नोकरीला असून त्यांना ४ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या क्रमांकावरुन संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, बँक ऑफ महाराष्ट्र कस्टमर केअरमधून बोलत असून या बँकेची गेलेली रक्कम तुम्हाला मिळवून देतो. यासाठी त्यांच्या व्हॉटस् अप क्रमांकावर कस्टमर सपोर्ट -४ एपीके, कम्प्लेन रजिस्टर एपीके व एनी- डेस्क या ॲप्लिकेशनची लिंक पाठवून ते डाऊनलोड करण्यास सांगितले.

या दरम्यान त्यांनी महिलेचा विश्वास संपादन करीत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महिलेच्या मोबाईलचा एक प्रकारे ताबा घेत कॅनरा बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती चोरुन घेतली. त्याआधारे त्यांच्या या खात्यातून ८ लाख ५५ हजार ४१ रुपये ऑनलाईन काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने शनिवारी ५ ऑगस्ट रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बी.डी. जगताप हे करीत आहेत.