नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मुक्ताईनगरच्या तरुणाला लावला साडे तेरा लाखाचा चुना
जळगाव लाईव्ह न्यूज । 3 फेब्रुवारी 2024 । अलीकडे फसवणुकीच्या घटना प्रचंड वाढल्या असून विविध माध्यमातून लोकांची हजारो-लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील तरुणाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली साडे तेरा लाख रुपयाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रमोद शांताराम सावदेकर (रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमका प्रकार काय?
मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी असलेल्या फकीरा अर्जुन सावकारे ( वय २५) या तरूणाने काल मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात नमूद केले आहे की, या तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय ओळख्या असल्याचे सांगितले. आपण तुला कृषी उद्योग विकास महामंडळ अथवा जिल्हा दुध संघात नोकरी लाऊन देऊ मात्र यासाठी पैसे लागतील असे आमीष त्यांनी दाखविले.
या अनुषंगाने फकीरा सावकारे यांनी प्रमोद सावदेकर याला पाच लाख रूपये रोख दिले. यानंतर त्याने सावकारे यांना जिल्हा दुध संघात परिक्षा देण्यास सांगितले. परिक्षा दिल्यानंतर पुन्हा पाच लाखांची मागणी केली. यानुसार त्यांनी १२ डिसेंबर २०२१ रोजी त्याला पुन्हा पाच लाख रूपये दिलेत. तर ऑर्डर कन्फर्म करण्याच्या नावाखाली त्याने साडे तीन लाखांची मागणी केल्यावर त्याने पुन्हा ही रक्कम मार्च २०२२ मध्ये उकळली. यानंतर त्यांनी संपर्क टाळण्यास प्रारंभ केला. प्रमोद सावदेकर याने फकीरा सावकारे यांना दोन लाख रूपयांचा धनादेश दिला असता तो वटला नाही. यामुळे या प्रकरणात आपली साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक झाल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात प्रमोद शांताराम सावदेकर ( रा. जळगाव) याच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशीरा त्याला अटक करण्यात आली आहे. तर , या व्यक्तीने राजकीय नेत्याशी असलेले संबंध दाखवून अशाच प्रकारे अनेक तरूणांना गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे.