कष्ट करुन पै-पै जमवली, पण.. जळगावातील १३ महिलांची ५५ लाखात फसवणूक ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज : 22 फेब्रुवारी 2024 : सध्याच्या काळात फसवणूकीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. दिवसेंदिवस या घटनामध्ये वाढ होतं असून यातून अनेकांना हजारो लाखो रुपयात गंडविले जातं आहे. आता असाच फसवणूकीचा मोठा प्रकार जळगावातून समोर आला. भिशीसाठी पैसे गोळा करण्यासह सासऱ्याच्या उपचारासाठी पैसे उसनवार घेऊन एका दाम्पत्याने १३ महिलांची तब्बल ५५ लाख २२ हजार २८० रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नेमका प्रकार काय?
कोल्हे हिल्स परिसरातील योजनानगरमध्ये राहणाऱ्या महिलांकडून दर महिन्याला खासगी भिशीच्या नावाने सविता संजय सोळंखे व तिचा पती संजय धोंडू सोळंखे (दोन्ही रा. योजना नगर) यांनी भिशीच्या नावाने पैसे जमा केले. त्यात काही जणांच्या भिशी लागल्या. मात्र, पैशाचे काम असल्याचे सांगत ही रक्कम सदर महिलेनेच ठेवून घेतली. त्याबदल्यात जास्त पैसे मिळतील, असे आमिषही या महिलेसह तिचा पती संजय सोळंखे या दोघांनी संगनमत करून दाखवले.
त्यानंतरदेखील सासरे आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून परिसरातील महिलांकडून या महिलेने उसनवारीने पैसे घेतले. या महिलांचा बचत गटही असल्याने त्यांच्या नावाने बचत गटाच्या माध्यमातून कर्ज तर घेतलेच, शिवाय काही महिलांच्या नावावर वैयक्तिक कर्जही काढून ती रक्कमही सोळंखे या महिलेने घेतली. प्रत्येक वेळी आजार अथवा कोणत्याही कामाच्या बहाण्याने विश्वास संपादन करत ही महिला रक्कम घेत गेली.
दिलेले पैसे परत मिळावेत म्हणून या महिलांनी वारंवार सदर महिलेच्या घरी चकरा मारल्या. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पैशाचा तगादा वाढत असल्याने सदर महिला पतीसह गायब झाली आहे. सोळंखे दाम्पत्य पसार झाल्याने पल्लवी विजय ठोसर (३९, रा. योजनानगर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सविता संजय सोळंखे व संजय धोंडू सोळंखे या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत
दरम्यान, यातील काही महिलांनी कोरोनाकाळात मास्क शिवण्यासह इतर घरगुती कामे करून पै-पै जमवली होती.मात्र भिशीसाठीची रक्कम घेऊन व उसनवारीने पैसे घेऊन आमचा विश्वासघात केला गेला, अशी व्यथा ५५ लाख रुपयांमध्ये फसवणूक झालेल्या महिलांनी व्यक्त केली.