⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

शेतकऱ्यांनो लक्ष द्या : फसवे एसएमएस पासून सावधान, प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेच्या नावाखाली फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे अपर महासंचालकांनी केले आहे. अशी माह‍िती ज‍िल्हा व्यवस्थापक श‍िवाजी बोडके यांनी द‍िली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ३, ५ व ७.५ एच.पी क्षमतेचे सौर कृषिपंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत. सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-यास १० टक्के आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भारण्यासाठीचा SMS पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास १०४८२३ सौर कृषिपंपांसाठी मान्यता दिली. सदर मान्यतेनुसार महाऊर्जमार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. महाऊर्जामार्फत सद्यःस्थितीत सुमारे ७५७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.

महाऊर्जाने योजना राबविण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B हे स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यापासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश (एसएमएस) पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरण्याची व पुरवठादार निवडण्याची शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटा एसएमएस प्राप्त झाला असेल तर अशा एसएमएस पासून व त्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीपासून सावध राहावे. असे आवाहन महाऊर्जेद्वारे करण्यात आले आहे.