जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । चाळीसगाव (Chalisagaon) तालुक्यातील नागद रोड परिसरातील तीन ते चार घरांना आग लागल्याची घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नसून मात्र संसार उपयोगी वस्तू जाळून खाक झाल्याची माहिती आहे. दोन तासानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या घटनेबाबत असे की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील कृषी बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमधील तीन ते चार घरांना अचानक आग लागली. यात संसार उपयोगी वस्तू ,पैसे, महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाले असून आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाहीय. मात्र, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
संपूर्ण घर जळून खाक झाल्याने नागरिकांना अश्रू अनावर आले. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून घटनास्थळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाची प्रशासन दाखल झाले. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच, अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली फायर टीम घटनास्थळी पोहोचली. टीमने तातडीने आग विझवण्याचे काम केला. दोन तासानंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीच्या भीषणतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.