जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी । जळगावच्या एसीबी पथकाने एक मोठी कारवाई केली. ४० हजार रुपयांची लाच घेताना पारोळा तालुक्यातील मेहु गावातील विद्यमान महिला सरपंच, तिचा पती, मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चार जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नेमका प्रकार काय?
मेहु गावात सात लाख रुपये किमतीची व्यायामशाळा बांधण्यासाठी धनश्री कंट्रक्शन या कंपनीला करार देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी २०२३ मध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून जिजाबाई गणेश पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर धनश्री कंट्रक्शनच्या प्रतिनिधीने सरपंचांकडे मंजूर निधीची मागणी केली. यावेळी सरपंचांनी सात लाख रुपयांपैकी चार लाख रुपयांचा धनादेश कंपनीला दिला होता. उर्वरित तीन लाख रुपयांचा निधी देण्यासाठी सरपंचांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती.
सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या पती गणेश सुपडू पाटील यांनी या रकमेची तडजोड करून ती ४० हजार रुपयांवर आणली. त्यानंतर सरपंचांच्या मुलगा शुभम गणेश पाटील आणि सेतू सुविधा केंद्र चालक समाधान देवसिंग पाटील याला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. समाधान पाटील यांनी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पारोळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.