⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कुसुंबा येथील दांपत्याच्या खून प्रकरणाचा उलगडा ; चार जण ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२१ । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील ओमसाई नगरात राहणार्‍या मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा दि. २२ एप्रिल ला खून झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, या दांपत्याच्या खून प्रकरणाचा चार दिवसांत उलगडा झाला आहे.

आज सोमवारी पहाटे चार वाजता चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा,ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०), अरुणाबाई गजानन वारंगे (३०)  व चंद्रकला सुभाष धनगर तिघे रा. कुसुंबा, ता. जळगाव याचा समावेश आहे. अरुणाबाई व देविदास यांना कुसुंब्यातून तर सुधाकर याला चिंचखेडा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

याबाबत असे की, कुसुंबा येथील ओमसाई नगरात राहणार्‍या दांपत्याचा दि २२ एप्रिल ला खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता पाटील दाम्पत्याच्या व्याजाच्या व्यवसायातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले होते. या दिशेने तपास केला असता आरोपींची खातरजमा करण्यात आला. यानंतर आज पहाटे चार वाजता चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

व्याजाच्या पैशाचे तसेच जुन्या वादातून खून केल्याची कबुली चौघांनी दिली आहे. अरुणाबाई हिने आशाबाईकडून १२ लाख रुपये व्याजाने घेतले होते. आशाबाईच्या अंगावरील दागिनेही हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली होती तर गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.