जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात रोज कुठेना कुठे अपघात (Accident) होतच असून यात काहींना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच आता भरधाव कंटेनरने माजी सरपंचाला चिरडल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर (Muktainagar) ते बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर नायगाव फाट्याजवळील उड्डाणपूल परिसरात घडली. रघुनाथ नाना पाटील (वय ७०, रा. पिंप्रीपंचम ता. मुक्ताईनगर) असे मयत माजी सरपंचाचे नाव असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आलीय.

या घटनेबाबत असे की, पिंपरीपंचम (ता. मुक्ताईनगर) येथील माजी सरपंच रघुनाथ पाटील हे टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी (एमएच.१९-बीएफ.६८३) ने मुक्ताईनगरकडे जात होते. नायगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रक कंटेनरने (एचआर.३८-एडी.५१०९) ने त्यांना मागून धडक दिली.
विजय महेश्वर बैठक (रा. लखनीतपुरमेसपट्टी ता. उजियारपूर जि. समस्तीपुर बिहार) हा कंटेनर चालवत होता. या अपघातात कंटेनरचे चाक रघुनाथ पाटील यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान तुकाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत अपघाताची नोंद झाली. तपास हवालदार लीलाधर भोई हे करत आहेत.
साइटपट्टीचा अभाव, हेच अपघाताचे कारण :
नायगाव फाट्याजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूने महामार्गावर गतिरोधक बसवले आहेत. तरीही वाहने भरधाव चालवली जातात. दुसरीकडे या भागातील रस्त्याला साइडपट्ट्या नाहीत. त्यामुळे खोलगट भागातून महामार्गावर वाहन चढवावे लागते. मंगळवारच्या अपघाताला हेच कारण ठरले. खचलेल्या साइडपट्टीवरून दुचाकी महामार्गावर आणताना ती घसरली. यामुळे खाली पडलेल्या पाटील यांच्या डोक्यावरून मागून येणाऱ्या कंटेनरचे चाक गेले. अपघात झाल्यावर साइटपट्टी भरण्यात आली.