पाचोरा पीपल्स बँकेच्या माजी चेअरमनला १४ दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा येथील पीपल्स बॅँकेचे माजी चेअरमन अशोक हरकचंद संघवी यांना गैरव्यवहार प्रकरणात सोमवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पोलिसांनी अटक केली. दोन वर्षे पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर ते सोमवारी स्वत:हून पाचोरा पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सविस्तर असे की, पाचोरा पीपल्स बॅँकेचे माजी चेअरमन अशोक हरकचंद संघवी हे १५ वर्ष पदावर होते. पदावर असताना नातेवाइक व मर्जीतील कर्जदारांना अमाप कर्ज वाटप केले होते. याशिवाय बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर बॅँकेवर प्रशासक नियुक्त असताना, त्यांनी तत्कालीन व्यवस्थापक नितीन टिल्लू यांना हाताशी धरून बॅँकेत देखभाल दुरुस्तीसह फर्निचर बनवल्याचे ३ लाख ५४ हजार रुपयांचे बनावट व्हाऊचर टाकून पैसे लाटले होते.
याप्रकरणी संदीप महाजन यांनी १८ जुलै २०१९ रोजी दावा दाखल केला होता. अशोक संघवी यांनी औरंगाबाद खंडपीठात व त्यानंतर हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला. दोन्ही ठिकाणी जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही अशोक संघवी पोलिसांना दाद देत नव्हते. अखेर ते २२ रोजी सकाळी साडेदहा वाजता पाचोरा पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तत्कालीन व्यवस्थापक नितीन टिल्लु पसार आहे.