जळगाव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२१ । मागील काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ अंशांपर्यंत वाढला आहे. दिवसेंदिवस तापणाऱ्या उन्हांमुळे जळगावकर चांगलेच त्रासले आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, सायंकाळच्या वेळेस जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक त्रस्त आहेत. तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत पोहोचला आहे, त्यातच जिल्ह्यात १८ ते २० कि.मी. वेगाने उष्ण वारे वाहत असल्याने घरात थांबनेदेखील कठीण झाले आहे. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, रात्री १० वाजेपर्यंतदेखील उष्णतेचा झळा कायम असल्याने, नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्यास तापमानात काहीअंशी घट होऊन पारा ३८ अंशापर्यंत येण्याचाही अंदाज आहे. मात्र, पुढील आठवड्यापासून पुन्हा तापमानात वाढ होऊन पारा ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीत दक्षिण मध्यप्रदेश व विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यातच बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रयुक्त हवेमुळे जिल्ह्यात आगामी तीन दिवस अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सायंकाळच्या वेळेस जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह काही भागांत वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार जिल्ह्यात पावसाची शक्यता ४५ टक्के इतकी आहे.