जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ । बंगालच्या मालदामध्ये दोन पुरुषांचे जबरदस्तीने मुस्लीम समाजात धर्मपरिवर्तन करण्यात आल्याचे प्रकरण न्यायालयात आले आहे. दोन्ही महिलांनी दाखल केलेल्या विशेष याचिकेवर सुनावणीत कलकत्ता उच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआय व एमआयएकडे सोपविले आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्यातर्फे ऍड.मोहम्मद गालिब यांनी, त्या महिलांच्या पतींनी कलम 164 अंतर्गत साक्ष दिली असून त्यांनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्विकारल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयात दोन महिलांनी विशेष याचिका दाखल केलेली आहे. दोन्ही महिलांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांचे पती २४ नोव्हेंबर २०२१ रोजी बेपत्ता झाले होता. महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता एका व्यक्तीने दोन्ही पतींनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे सांगत त्यांची तक्रार फाडली. यानंतर त्यांनी मालदाच्या एसपी कार्यालयात तक्रार केली पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. वास्तविक, दोन्ही याचिकाकर्ते बहिणी आहेत आणि त्यांचे पतीही भाऊ-भाऊ आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पतींनी एका पक्षासाठी काम केले होते आणि तो पक्ष निवडणुकीत पराभूत झाल्याचा आरोप या दोन्ही महिलांनी केला आहे.
दि.२४ नोव्हेंबर रोजी पती बेपत्ता झाल्यानंतर याचिकाकर्त्यांनी मोथाबारी आणि कालियाचक पोलिस ठाण्यात तक्रारीही केल्या होत्या. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्यातर्फे वकील मोहम्मद गालिब यांनी सांगितले की, कौटुंबिक वादामुळे याचिकाकर्त्यांचे पती त्यांना सोडून मालदा येथील प्रतापपूर येथे राहत आहेत. ते म्हणाले की, दोन जणांनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. त्यांनी आपल्या घरी परतण्यासही नकार दिला आहे. तसेच त्यांच्या पतींनी कलम 164 अन्वये साक्ष दिली आहे की, त्यांनी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारला आहे.
दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाचा तपास सीबीआय आणि एनआयएकडे सोपवला. तसेच एसपी मालदा यांना या प्रकरणात सीबीआय आणि एनआयएला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांकडून सक्तीचे धर्मांतर, बनावट चलन, शस्त्रसाठा आणि सीमापार घुसखोरी या आरोपांची चौकशी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.