⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बाबासाहेबांसाठी जात, धर्म नव्हे देश महत्वाचा, माईसाहेब का म्हणाल्या असे, जाणून घ्या…

बाबासाहेबांसाठी जात, धर्म नव्हे देश महत्वाचा, माईसाहेब का म्हणाल्या असे, जाणून घ्या…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । देशभरात गुरुवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. जळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सहभागी मंडळांचे स्वागत करण्यासाठी विविध पक्ष, संघटनेकडून व्यासपीठ देखील उभारण्यात आले होते. मिरवणूक शांततेत सुरु होती, सर्वत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष सुरु असताना अचानक निळ्यासोबत हिरवे, भगवे फडकू लागले. घोषणांची खिचडी होऊ लागली. वातावरण दूषित होऊ नये म्हणून समाजसेवक वारंवार सूचना करीत होते. एका व्यासपीठावर बसलेल्या बाल किर्तनकार माईसाहेब पाटील यांनी बाबासाहेबांचे विचार, तत्व लक्षात आणून देत जात, धर्म नव्हे देश महत्वाचा असल्याची जाणीव तरुणाईला करून दिली.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे १४ एप्रिल. दरवर्षापेक्षा यंदाची जयंती काही खास होती. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना असल्याने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आलेली नव्हती त्यामुळे यावर्षी जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. जळगाव शहरात सालाबादप्रमाणे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सुभाष चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन मार्गावर विविध परिसरातील मिरवणूक सुरु होती. प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले होते.

नेहरू चौक ते टॉवर चौक विशेष गर्दी होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास मिरवणूक रंगात येत होती. मनपाच्या १७ मजली इमारतीसमोर मिरवणुकीतील तरुण निळे झेंडे घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार करीत होते. काही तरुण भगवे झेंडे घेऊन नाचत होते तोच अचानक एक गट आला आणि हिरवे झेंडे घेऊन नाचू लागला. जय भीमच्या घोषणा सुरू होत्या. गर्दीत निळे, हिरवे आणि भगवे झेंडे फिरवण्याची स्पर्धाच सुरू झाली. दोन्ही व्यासपीठावरून तरुणांना कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही आणि मिरवणूक शांतपणे पार पाडण्यासाठी आवाहन करण्यात येत होते. माईकवरून निवेदक डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे महत्व पटवून देत असताना अचानक जय भीम ऐवजी दुसऱ्याच घोषणा सुरू झाल्या. काही तरुणांनी तर कहरच केला. व्यासपीठावर चढून माईक हातात घेत घोषणा दिल्या आणि काढता पाया घेतला.

एका व्यासपीठावर बसलेल्या कीर्तनकार माईसाहेब पाटील यांनी, तरुणांचे प्रबोधन करण्याचा विडा उचलला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी नेहमी देश महत्वाचा होता. जाती, धर्माच्या भिंती पाडण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची केले. आपण खरे बाबासाहेबांचे अनुयायी असाल तर जात, धर्म प्राधान्य न देता, त्यावरून वाद न घालता देशाला प्राधान्य देणार. डॉ.बाबासाहेबांच्या तत्वावर चालणे हाच खरा बाबासाहेबांना मानाचा मुजरा असेल, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मिरवणुकीत होत असलेल्या प्रकाराने पोलीस प्रशासन कामाला लागले. निळे सोडून इतर झेंडे ताब्यात घेण्यात आले. मिरवणुकीतील प्रकारामागे कोण होते, काही उद्देश होता का? हे सर्व तपासणे सुरू आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.