जळगाव लाईव्ह न्यूज : १८ सप्टेंबर २०२३ : तापी नदीच्या उगम स्थानात आणि मध्य प्रदेशात झालेल्या जोरदार पावसामुळे तापी नदीला मोठा पूर आला आहे. हतनूर मध्यम प्रकल्पाचे सर्व ४१ दरवाजे उघडून देखील त्यातून पुराचे पाणी न निघाल्याने शनिवारी तालुक्यातील गावांमध्ये बॅक वॉटरचे पाणी ऐनपूर, विटवा, निंबोल, पातोंडी, अजनाड, खिरवड आदी गाव, शेतशिवारात शिरले. बॅक वॉटरचे पाणी शेती शिवारात व रस्त्यावर आल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. आता शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतिक्षा आहे.
हतनूर मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील ६ गावांतील ८५ पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. ऐनपूर येथे बाजारपट्ट्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून, ऐनपूर-निंबोल रस्त्यावर पाच फुटापेक्षा अधिक पाण्याची पातळी वाढली असल्याने निंबोल-विटवा गावांशी संपर्क तुटला आहे. ऐनपूर गावात तिन्ही बाजूंनी पाण्याचा वेळा असून, येथील प्राथमिक उर्दू शाळेत पुराचे पाणी शिरले होते. पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गिरीष महाजनांचे प्रशासनाला आदेश
तापी नदीला आलेल्या पुरामुळे व बॅकवॉटरने बाधीत शेतपिकांची तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या गावातील ६७ कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम केले. तलाठी, महसूल सहायक यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर करावा. लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. असा सूचनाही ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिलेल्या आहेत.
कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
हतनूर मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील ६ गावांतील ८५ पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खिरवड येथील २० व ऐनपूर येथील २५ कुटुंबांना तेथील जिल्हा परिषद शाळेत, निंबोल येथील ४ तर निंभोरासीम येथील १५ कुटुंब नातेवाईकांकडे आणि धुरखेडा येथील ३ कुटुंब जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले.